अमेरिका-रशियामध्ये होणारे का सिक्रेट डील? म्हणूनच रात्रीत झाला इतका मोठा ‘खेळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 09:44 IST2026-02-14T09:30:11+5:302026-02-14T09:44:27+5:30

America Russia Deal: अमेरिकन डॉलर मजबूत करण्यासाठी आणि त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत असून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका आता रशियासोबत एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे.

America Russia Deal: अमेरिकन डॉलर मजबूत करण्यासाठी आणि त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत असून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका आता रशियासोबत एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. हा करार यशस्वी झाल्यास जागतिक स्तरावर शेअर बाजारातील वातावरण सुधारू शकते.

मात्र हा करार झाल्यास सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या संभाव्य आर्थिक भागीदारीअंतर्गत अमेरिकन डॉलर सेटलमेंट सिस्टममध्ये परत येण्याचा सक्रिय विचार करत आहेत. याचाच अर्थ रशिया आणि अमेरिका यांच्यातील कोणताही व्यवहार पुन्हा एकदा डॉलरमध्ये होऊ शकतो.

हे वृत्त समोर येताच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी उशिरा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने ४ टक्क्यांनी तर चांदी ८ टक्क्यांहून अधिक घसरली होती. भारतीय बाजारपेठेत एमसीएक्सवरही याचे पडसाद उमटले असून चांदीत दोनदा लोअर सर्किट लागलं.

अखेर चांदी २६,००० रुपयांनी तर सोनं ६,००० रुपयांहून अधिक घसरून बंद झालं. या घसरणीमागे अमेरिका-रशिया करार या बातमीव्यतिरिक्त अमेरिकेचा मजबूत जॉब डेटा आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची कमी झालेली अपेक्षा ही देखील महत्त्वाची कारणं ठरली आहेत.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, या प्रस्तावात जीवाश्म इंधन, नैसर्गिक वायू, तेल आणि महत्त्वाचा कच्चा माल अशा सात क्षेत्रांमधील आर्थिक कराराची रूपरेखा देण्यात आली आहे. २०२२ मध्ये निर्बंध लादले गेल्यामुळे आणि स्विफ्ट (SWIFT) प्रणालीतून बाहेर काढल्यानंतर डॉलरपासून दूर राहिलेला रशिया आता पुन्हा डॉलर आधारित व्यापारात प्रवेश करण्यावर भर देत आहे.

यापूर्वी रशियाने आपला व्यापार स्थानिक चलनात केला असून चीन आणि भारतासोबतचा सुमारे ९० टक्के व्यापार राष्ट्रीय चलनामध्येच केला आहे. तसंच ब्रिक्स देशांमधील स्थानिक चलनातील व्यवहार ६० ते ६७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. मात्र, आता उच्च स्तरावर विचार सुरू असलेल्या या प्रस्तावामुळे जगातील दोन मोठ्या ऊर्जा शक्ती प्रतिस्पर्ध्याऐवजी भागीदार बनू शकतात.

या करारानंतर सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे लोक सोन्या-चांदीची विक्री करून आपला पैसा शेअर बाजारात गुंतवू शकतात, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या दरात मोठी दुरुस्ती किंवा घसरण दिसून येऊ शकते. रशियन अधिकाऱ्यांमध्ये फिरणाऱ्या या उच्च-स्तरीय दस्तऐवजात जीवाश्म इंधनाला प्राधान्य देण्याची रणनीती आखण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यात डॉलरचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते.