Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरूच; 44 हजारांच्याही खाली आला भाव, चांदीही झाली स्वस्त!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 5, 2021 08:29 PM2021-03-05T20:29:46+5:302021-03-05T20:38:16+5:30

यापूर्वीच्या व्यवसायिक सत्रात सोन्याचा दर 44,409 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 66,627 वर बंद झला होता. (Gold Silver Price)

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. आजही सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. चांदीचे भावही पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. (Gold prices Prices fell below Rs 44,000, silver also became cheaper)

दिल्लीत सोन्याचा दर कमी होऊन 44 हजार रुपयांच्याही खाली आला आहे. याशिवाय चांदीचे दरही घसरल्याचे आज पाहायला मिळाले. आज चांदीचे दर 65000 रुपयांच्याही खाली आली आहेत.

एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गडगडल्याने, दिल्लीतील सराफा बाजारातही सोन्याचे दर शुक्रवारी 522 रुपयांनी घसरून 43,887 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहेत.

यापूर्वीच्या व्यवसायिक सत्रात सोन्याचा दर 44,409 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदीचा भावही घसरला - सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज 1822 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे आज चांदीचा दर 64,805 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला. एक दिवस आधी म्हणजे काल चांदीचा दर 66,627 वर बंद झला होता.

यासंदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, 'कॉमेक्स (न्यूयॉर्क येथील जिन्स एक्सचेन्ज)मध्ये सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनुसार, दिल्ली बाजारात आज 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 522 रुपयांनी घसरली.'

तर अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आता 1696 डॉलर प्रति औंसवर झाली आहे. याशिवाय चांदीचा दर 25.20 डॉलर प्रति औंसवर आला आह.

कसा ठरतो सोन्याचा भाव? - कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा भाव - आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.

सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.