'सोन्यातील तेजी सध्या थांबणार नाही...' कोण म्हणालं असं? ही आहेत महत्त्वाची कारणं, चीनचंही आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:01 IST2026-02-12T08:47:34+5:302026-02-12T09:01:41+5:30
Gold Rate China Connection: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठ्या घसरणीनंतर अचानक उसळी पाहायला मिळाली होती, त्यानंतर याच पुन्हा चढ उतार पाहायला मिळाले. या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात असतानाच एक नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

Gold Rate China Connection: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठ्या घसरणीनंतर अचानक उसळी पाहायला मिळाली होती, त्यानंतर याच पुन्हा चढ उतार पाहायला मिळाले. या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात असतानाच एक नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, येणाऱ्या काळात सोन्याचे दर पुन्हा मजबूत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तेजीमागे 'चीन कनेक्शन'चा मोठा वाटा असल्याचंही समोर आलंय.

गेल्या वर्षी सुरू झालेली सोन्यातील तेजी जानेवारी २०२६ च्या अखेरपर्यंत कायम होती. २९ जानेवारी रोजी एमसीएक्सवर सोनं १,९३,०९६ रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं होतं, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यानं पहिल्यांदाच ५००० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला होता. सुरुवातीच्या तेजीनंतर मोठी घसरण झाली असली तरी, तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीला खालच्या स्तरावर चांगलं समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सने १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जानेवारीत आलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याची निम्मी वाढ पुसली गेली आहे, तरीही सोन्याचा दर ५,००० डॉलर प्रति औंस या महत्त्वाच्या पातळीवर स्थिर झाला आहे. जानेवारीत लंडन स्पॉट मार्केटमध्ये सोन्यानं ५,५९४ डॉलर प्रति औंसचा विक्रमी स्तर गाठला होता, मात्र महिन्याच्या शेवटी मोठी नफावसुली दिसून आली.

भू-राजकीय तणावात झालेली घट हे किमती घसरण्याचं मुख्य कारण ठरलं. असं असूनही, एलबीएमए (LBMA) आणि कॉमेक्स (COMEX) या दोन्ही बाजारांत किमती ५,००० डॉलरच्या वर टिकून आहेत आणि मासिक आधारावर १०% पेक्षा जास्त वाढ नोंदवत आहेत, जे सोन्याची मजबूत मागणी दर्शवते.

सोन्याच्या भविष्यातील तेजीला गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण वाढीचा मोठा आधार मिळत आहे. रिपोर्टनुसार, २०२५ मध्ये सोन्याची जागतिक मागणी पहिल्यांदाच ५,००० टनांच्या पार गेली, ज्याचं एकूण बाजार मूल्य ५५५ अब्ज डॉलरवर पोहोचलं आहे. हे मूल्य मागील वर्षाच्या तुलनेत ४५% जास्त आहे. जागतिक गोल्ड ईटीएफ (Gold ETF) मध्ये सोन्याचा हिस्सा ८०१ टनांनी वाढला, जी इतिहासातील दुसरी सर्वात मोठी वार्षिक वाढ ठरली आहे.

तसच सोन्याची नाणी आणि बिस्किटांची मागणी १२ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. ही गती २०२६ मध्येही कायम असून जानेवारी महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये १९ अब्ज डॉलरची विक्रमी मासिक गुंतवणूक झाली आहे, ज्यामुळे जागतिक ईटीएफ व्यवस्थापनाखालील मालमत्ता ६६९ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

सोन्याच्या दरातील वाढीसाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी केलेली खरेदी हा एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. २०२५ मध्ये केंद्रीय बँकांची निव्वळ खरेदी ३२८ टन राहिली आहे. विशेषतः सोन्याच्या किमती वाढवण्यात चीनची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेनं (पीपल्स बँक ऑफ चायना) जानेवारीत सलग १५ व्या महिन्यात सोन्याची खरेदी सुरू ठेवली, ज्यामुळे किमतींना आधार मिळाला आहे. सरकारी क्षेत्राकडून होणारी ही मागणी बाजाराला अधिक मजबूती देत आहे.

अहवालातील निष्कर्षांनुसार, सोन्याच्या किमती अल्प कालावधीसाठी एका मर्यादित कक्षेत राहू शकतात, परंतु मध्यम आणि दीर्घ कालावधीत त्यात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. जागतिक तणाव कमी झाल्यामुळे सध्या सोन्याची गती मंदावली असली तरी, केंद्रीय बँकांची सततची खरेदी आणि ईटीएफमधील जोरदार गुंतवणूक यामुळे सोन्याला बळकटी मिळत राहील. सध्याचा नफावसुलीचा काळ संपल्यानंतर बाजार पुन्हा एकदा या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करेल आणि सोन्याची भूमिका अधिक भक्कम होईल, असा विश्वास विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

















