Gold : सोनं पुन्हा ५० हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता; पाहा काय आहे त्यामागील कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 03:21 PM2021-04-16T15:21:06+5:302021-04-16T15:25:33+5:30

Gold Price : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळताना दिसत आहेत.

गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळताना दिसत आहेत. MCX वर सोन्याचे दर ४७ हजार रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचले आहेत. हे दर गेल्या ७ आठवड्यांचे हाय आहेत.

गेल्या तीन आठवड्यांमध्ये सोन्याच्या दरात ५.४० टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आणि सोन्याचे दर ४७,१७५ रूपयांवर पोहोचले.

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा ट्रेंड यापुढेही कायम राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी बाजारातील अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात.

सोनं लवकर ५० हजार रूपये प्रति १० ग्रॅमच्या वर जाऊ शकते. सध्या सोन्याचे दर हे आपल्या विक्रमी उच्चांकापेक्षा अद्यापही ९ हजार रूपये प्रति १० ग्रामनं कमी आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची झळाळी कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे १७५२ डॉलर्स प्रति औसवर पोहोचले आहेत.

तर फिजिकल मार्केटबाबत सांगायचं झालं तर देशात सोन्याचे दर ४९,२०० प्रति १० ग्रामवर पोहोचले आहे.

काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन ते ४४ हजार रूपये प्रति १० ग्रामवर आले होते. परंतु त्यात पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कच्चा तेलाच्या दरात तेजी, रूपयाची घसरण, ग्लोबल इनफ्लेशन वाढण्याची भीती आणि १० वर्षांच्या यील्ड बॉन्डमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे दर वाढले आहेत.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अॅण्ड करन्सी) अनुज गुप्ता सांगतात की कोरोना विषाणूच्या आणखी एका लाटेने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेबद्दल चिंता निर्माण केली आहे.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

अमेरिकेत १० वर्षांच्या बॉन्ड यील्डमध्ये १.५६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्यही घसरलं आहे.

रूपया दहा महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहे. पुढे जाऊन त्यात अजूनही घसरण होऊ शकते. या गोष्टी सोन्याचे दर वाढवण्यास मदत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतही तेजी आहे. हे प्रति बॅरल ६६ डॉलर्सच्या पुढे आहे आणि ब्रेंट ७० डॉलर्सचा टप्पा ओलांडू शकेल. यामुळे जागतिक महागाई वाढण्याची भीती आहे.

हा बाबी आता बाजारात राहणार आहेत. तसंच अक्षय तृतीयादेखील यएणार आहे. ज्यामुळे सोन्याची मागणी वाढू शकते, असंही त्यांनी सांगितलं.

यावर्षी दिवाळीपर्यंत सोन्याचे दर ५२००० किंवा ५३००० रूपयांपर्यंत जाऊ शकतात अशी शक्यताही अनुज गुप्ता यांनी व्यक्त केली.