Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:32 IST2026-04-11T10:21:57+5:302026-04-11T10:32:21+5:30
Gold Rate Today: देशात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने फिजिकल गोल्डच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर.

Gold Price Today: गेल्या एका महिन्यात सोन्याच्या किमतीत १०,१३१ रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. इंडियन बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या दरानुसार, शुक्रवारी सकाळी सोन्याचा भाव १,५०,३०५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

१० मार्च २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,६०,४३६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला होता. सोन्यासोबतच गेल्या एका महिन्यात चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. १० मार्च २०२६ रोजी १ किलो चांदीचा दर २,७२,८३० रुपये होता, जो १० एप्रिलपर्यंत ३२,८९६ रुपयांनी कमी झाला आहे. काल संध्याकाळी चांदीचा दर २,३९,९३४ रुपये प्रति किलो या स्तरावर होता.

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, २३ कॅरेट सोन्याचा दर १,४९,७२५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,३७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला आहे. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्यासाठी १,१२,७४५ रुपये आणि १४ कॅरेट सोन्यासाठी ८७,९४१ रुपये प्रति १० ग्रॅम अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे.

महिन्याभराच्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात काहीशी वाढ दिसून आली. ६ एप्रिल २०२६ रोजी सोन्याचा दर १,४७,८९१ रुपये प्रति १० ग्रॅम होता, मात्र सोमवार ते शुक्रवार या दरम्यान त्यात २,४३६ रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी म्हणजेच १० एप्रिलच्या संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५०,३२७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. शुक्रवारी रुपयाच्या किमतीत पुन्हा वाढ पाहायला मिळाली. काही काळापूर्वी डॉलरचा दर ९५ रुपयांच्या पुढे गेला होता, परंतु त्यानंतर रुपयानं वेगानं सावरत रिकव्हरी केली आहे.

तसेच देशात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने फिजिकल गोल्डच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे किमती वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.

















