चांदी ६ हजारांनी महागली तर सोन्यातही मोठी वाढ! 'या' कारणामुळे मौल्यवान धातूत पुन्हा तेजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:36 IST2026-02-25T10:23:28+5:302026-02-25T10:36:52+5:30
Gold Silver Price Hike : काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सकाळच्या सत्रात किंचित घसरण झाल्यानंतर आता पुन्हा किमतींनी उच्चांक गाठला आहे.

भारतीय कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव १,६०,७९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदीचा भाव २,६६,००० रुपये प्रति किलो झाला आहे.

मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या भावात ८७८ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीमध्ये तर मोठी झेप पाहायला मिळाली असून, ती एकाच दिवसात तब्बल ६,००० रुपयांनी महागली आहे.

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत ०.०३% ची वाढ झाली असून ते ५,९३२ डॉलर्स प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत आहे. अमेरिकेतील टॅरिफ धोरणांमधील अनिश्चिततेचा परिणाम या किमतींवर होत आहे.

आयटी हब मानल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १,४८,३१० रुपये मोजावे लागत आहेत.

बेंगळुरू आणि पाटणा या दोन्ही शहरांमध्ये चांदीचा दर २,८४,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीच्या वाढत्या किमतींमुळे औद्योगिक क्षेत्रासह सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोन्या-चांदीच्या या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यातील बाजारातील चढ-उतार पाहता गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत.

















