सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! चांदीत १८ हजारांची वाढ; तर सोन्यातही मोठी उसळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:43 IST2026-02-03T10:30:06+5:302026-02-03T10:43:08+5:30
Gold and Silver Prices : गेल्या काही सत्रांपासून सातत्याने कोसळणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आज (३ फेब्रुवारी) अचानक तेजी पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारामुळे बाजारातील अनिश्चितता काही अंशी कमी झाल्याने कमोडिटी मार्केटमध्ये सकारात्मक पडसाद उमटले आहेत. मात्र, या करारातील काही तांत्रिक अटींमुळे गुंतवणूकदारांमध्ये अद्याप धाकधूक कायम आहे.

आज बाजार उघडताच मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात ४% तर चांदीच्या दरात तब्बल ८% ची वाढ नोंदवण्यात आली. यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

या तेजीनंतर सोन्याचा भाव १,४८,५५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदीने पुन्हा २,५०,४३६ रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.

जागतिक बाजारपेठेतही सोन्याने ४,५०० डॉलरची पातळी ओलांडून ४,८३१.४० डॉलर प्रति औंसवर झेप घेतली आहे. चांदी देखील ८३.०१० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्के केल्याने बाजारातील भीतीचे सावट कमी झाले. यामुळे सोन्यातील घसरणीला तात्पुरता 'ब्रेक' लागला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, २९ जानेवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीने आपला सर्वोच्च ऐतिहासिक स्तर गाठला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत यात मोठी पडझड पाहायला मिळाली होती.

जरी मूळ टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले असले, तरी अमेरिकेने अद्याप २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ पेनल्टी कायम ठेवली आहे. ही बाब गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर टाकत आहे.

ट्रेड डीलमुळे मार्केटमधील 'अनिश्चितता' संपली असे वाटत असले, तरी धोरणात्मक बदलांमुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून पैसा काढून शेअर बाजाराकडे वळवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा घसरू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील ही आजची तेजी केवळ तांत्रिक सुधारणा असू शकते. अमेरिकेच्या व्यापार धोरणांमधील स्पष्टता जसजशी वाढेल, तसतसे सोन्याचे दर पुन्हा एकदा खालच्या पातळीवर येण्याची दाट शक्यता आहे.

















