गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:04 PM2021-03-25T18:04:02+5:302021-03-25T18:12:55+5:30

The Fuel Delivery अॅपच्या माध्यमातून आगामी कालावधीत दिल्ली एनसीआर आणि मुंबई या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची घरपोच सेवा दिली जाणार आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असून, फेब्रुवारीत तब्बल १६ वेळा झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोलने काही शहरात शंभरी ओलांडली होती. तर डिझेलच्या दरानेही काही शहरांमध्ये उच्चांक गाठला होता.

जागतिक कमॉडिटी बाजारातील कच्च्या तेलातील महागाईचे कारण त्यावेळी केंद्र सरकारने दिले होते. मागील आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किमतीत १५ टक्के घसरण झाली आहे.

आता घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलची ऑर्डर करा आणि इंधनाची होम डिलिव्हरी मिळवा, असे सांगितल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, ही बाब खरी असून, कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे.

एक नवीन अॅप आले असून, या अॅपच्या आधारे डोर टू डोर फ्युएल डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. The Fuel Delivery असं अॅपचे नाव असून, आगामी कालावधीत दिल्ली एनसीआर आणि मुंबई या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची घरपोच सेवा दिली जाणार आहे.

RST फ्युएल डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून हे महत्त्वाचे आणि वेगळे पाऊल उचलण्यात आले आहे. IANS च्या रिपोर्टनुसार, देशात फ्युएल डिलिव्हरी आणि त्याची मागणी लक्षात ठेऊन हा बदल करणार आहे, असे सांगितले जात आहे.

आम्ही प्रामुख्याने रिअल इस्टेट, हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट पार्क, शाळा, संस्था, बँका, शॉपिंग मॉल, गोडाऊन, परिवहन आणि लॉजिस्टिक तसेच कृषि क्षेत्रात फ्युएल होम डिलिव्हरी करण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत आहोत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

आगामी १२ ते १८ महिन्यात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी २ हजार कोटी रुपयांचा अंदाज वर्तवला आहे. मोबाइल अॅप तयार करण्यासाठी आयओटीची मदत घेतली आहे. पुढील ६ ते १२ महिन्यात चंदीगड, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता शहरात इंधनाची होम डिलिव्हरी सुरू करण्यात येणार आहे.

नवीन मोबाइल अॅपच्या माध्यमातून फ्युएल ऑर्डर आणि पेमेंटसुद्धा केले जाऊ शकणार आहे. ग्राहकांना फ्युएलची होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. निर्धारित शहरांमधील ग्राहक आपल्या स्मार्टफोनवरून घरात बसून फ्युएल ऑर्डर करू शकतील.

ग्राहक स्मार्टफोनच्या माध्यमातून फ्युएल डिलिव्हरीचे मॉनिटरींग करू शकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इंधन घरपोच मिळण्याबाबत चर्चा सुरू होती. आता आगामी काही दिवसांत याला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.

ऑइल मार्केटिंग कंपनी जसे की हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑयलसोबत मार्केट वेगाने विकसित होऊ शकते. काही स्टार्टअप कंपन्यांसोबत टायअप केले जाऊ शकते. यातून चालक, हेल्पर्स तसेच अन्य काही व्यक्तींसाठी रोजगारा उपलब्ध होऊ शकेल. कोरोना काळात ही सर्व्हिस खूपच फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, चौफेर टीकेनंतर अखेर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे आज देशभरात पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे.

बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैसे स्वस्त झाले आहे.त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.१९ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.२० रुपये झाला आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.७८ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.१० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.७७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.१० रुपये भाव आहे.

गुरुवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.९८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.९८ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.८२ रुपये असून डिझेल ८५.७४ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.३७ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.८१ रुपये आहे.

युरोपात करोनाची दुसरी लाट धडकल्याचे सध्या चित्र आहे. तेथील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने काही देशांनी लॉकडाउनचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे पुन्हा तेलाची मागणी कमी होईल, या भीतीने साठेबाजांनी तेलाची विक्री केली आहे. बुधवारी तेलाचा भाव ४ टक्क्यांनी कमी झाला.