वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:29 IST2025-07-17T16:04:37+5:302025-07-17T16:29:16+5:30
FSSAI Seals Bakery : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये पावात काचेचा तुकडा आढळल्याने कारवाई केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना ताजी असतानाच आता एका ७५ वर्षे जुन्या बेकरीचा थेट परवानाच रद्द केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

आपल्या देशात वडापाव, समोसे आणि मिठाईसारखे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून देण्याची जुनी सवय आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, असे करणे तुम्हाला आणि दुकानदारालाही महागात पडू शकते?
होय, वर्तमानपत्रात अन्नपदार्थ गुंडाळून ग्राहकांना देण्यास सक्त मनाई आहे. असे करणाऱ्या दुकानदाराच्या दुकानाला कायमचे टाळे लागू शकते.
याचे ताजे उदाहरण मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये दिसून आले आहे. तेथील प्रसिद्ध ७५ वर्षे जुनी 'आरबी स्टोअर' नावाची बेकरी अन्नपदार्थ वर्तमानपत्रात दिल्यामुळे बंद करण्यात आली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) ही कारवाई केली आहे. ही जुनी आणि आवडती बेकरी अचानक बंद करण्याच्या निर्णयामुळे स्थानिक ग्राहकांना धक्का बसला आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, बेकरीमध्ये ब्रेड आणि केकसारखे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकले जात होते, जे अन्न सुरक्षा नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. FSSAI ने अलीकडील तपासणीत हे उघड केले.
याशिवाय, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल इतर काही दुकानांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. FSSAI ने गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात कठोर कारवाई वाढवली आहे.
वर्तमानपत्राची शाई आणि त्यात असलेली रसायने अन्नात मिसळू शकतात, ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. गरम अन्न ठेवल्यावर हे विषारी घटक अन्नात मिसळतात.
यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार, असे केल्यास दंड, परवाना रद्द किंवा तुरुंगवास देखील होऊ शकतो.