पर्सनल लोन झटपट मिळवायचे आहे? अर्ज करण्यापूर्वी 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:02 IST2025-03-19T12:59:56+5:302025-03-19T13:02:16+5:30

Personal Loan : पर्सनल लोन झटपट मिळवायचे असेल तर तुम्हाला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा ऐनवेळी तुम्हाला बँकेचे हेलपाटे मारावे लागतील.

आर्थिक आणीबाणीकाळात पर्सनल लोन एखाद्या देवदुतापेक्षा कमी नाही. पण, त्यासाठी कर्जाला वेळेवर मंजुरी मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण यामध्ये उशीर झाला तर तुमची गरज भागणार नाही. अशा परिस्थितीत, काही टीप्स वापरुन तुम्ही अर्ज केला तर तुमचे वैयक्तिक कर्ज लवकर मंजुर होऊ शकते.

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, बँकेची वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅप सारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म निवडा. तुम्ही स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वापरून कुठूनही प्रक्रिया सुरू करू शकता. यामुळे कर्ज मंजुरी प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होते. किमान कागदपत्रांसह डिजिटल वित्तीय सेवांची निवड करा.

सह-अर्जदारासह वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केल्याने तुमची पात्रता वाढू शकते. परिणामी तुमचे कर्ज जलद मंजूर होऊ शकते. तुम्ही बँकेच्या सर्व अटी पूर्ण करत नसल्यास, तुमची पर्सनल लोन पात्रता वाढवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर, स्थिर उत्पन्न आणि दीर्घ क्रेडिट इतिहास असलेल्या सह-अर्जदार करा. यामुळे तुमचा अर्ज नाकारला जाण्याची आणि प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शक्यता कमी होते.

कोणत्याही कर्जामध्ये तुमचा CIBIL स्कोर महत्त्वाचा असतो. चांगला क्रेडिट स्कोअर असेल आणि इतर पात्रता निकषांची पूर्तता करत असल्यास तुम्ही बऱ्याच बँकांकडून त्वरित मंजुरीसह वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. क्रेडिट स्कोअर किंवा CIBIL स्कोर अनेक घटकांच्या आधारे मोजला जातो. उच्च स्कोअर राखण्यासाठी वेळेवर परतफेड करणे आवश्यक आहे.

तुमच्या कर्ज परतफेडीची क्षमता तपासण्यासाठी बँका तुमची आर्थिक स्थिरता आणि उत्पन्नाचे स्रोत तपासतात. वैयक्तिक कर्ज मंजूरीसाठी सामान्यत: तुमचे प्राथमिक उत्पन्न पाहिले जात असले तरी, लाभांश किंवा गुंतवणुकीतून मिळणारे व्याज, भाड्याचे उत्पन्न इत्यादींसारखे अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत असल्यास तुमची पात्रता वाढू शकते.

एकाच वेळी अनेक कर्जासाठी अर्ज करणे टाळा. याचा तुमच्या क्रेडिट प्रोफाइलवर परिणाम होऊ शकतो. परिणामी वित्तीय संस्था तुमचा अर्ज नाकारतील. त्याऐवजी, काही निवडक बँकांसह तुमची कर्जाची पात्रता तपासा. जिथे तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता आहे, तिथेच अर्ज करा.

शक्य तितक्या कमी परतफेडीचा कालावधी निवडा. जेव्हा तुम्ही कमी कालावधीत कर्जाची परतफेड करता, तेव्हा बँका तुम्हाला कमी जोखीम घेणारे कर्जदार म्हणून पाहतात, कारण यामुळे देयके चुकण्याची किंवा तुमच्या आर्थिक घडामोडींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कमी होते.

तुमचे आधीपासून खाते असलेल्या बँकेकडे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणे जलद मंजुरीसाठी उपयुक्त ठरू शकते. विशेषत: जर तुम्ही आधीच्या कर्जाची जबाबदारीने विहित मुदतीत परतफेड केली असेल. तर बँक तुमचे कर्ज लवकर मंजूर करण्याचा विचार करेल.