आधी अदानी समूहाला मदतीचा हात, आता बाबा रामदेव यांना साथ; GQGची पतंजलीत मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:37 AM2023-07-18T10:37:12+5:302023-07-18T10:44:44+5:30

अमेरिकेची कंपनी जीक्युजी पार्टर्नर्सनं (GQG Partners) अडचणीच्या काळात अदानी समूहाला साथ दिली

अमेरिकेची कंपनी जीक्युजी पार्टर्नर्स (GQG Partners) यांनी अडचणीच्या काळात अदानी समूहाला साथ दिली. एनआरआय राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीनं आता बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्समध्ये २,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

ऑफर फॉर सेलमध्ये (OFS) कंपनीनं पतंजलीमधील ५.९६ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्याची फ्लोअर प्राईस १,००० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. परंतु नॉन रिटेल इन्व्हेस्टर्नला प्रति शेअर १,१०३.८० रुपयेप्रमाणे अलॉटमेंट करण्यात आलं.

त्यानुसार, जीक्युजी पार्टनर्सचं भागभांडवल सुमारे २,४०० कोटी रुपये आहे. पतंजली फूड्सचा शेअर सोमवारी बीएसईवर २.९६ टक्क्यांनी वाढून १२५६.७० रुपयांवर बंद झाला.

ओएफएसच्या माध्यमातून पतंजलीनं गुरुवारी सुमारे ७ टक्के शेअर्स म्हणजेच २.२८ कोटी शेअर्सची विक्री केली. ही विक्री नॉन रिटेल इन्व्हेस्टर्सना करण्यात आली. नॉन रिटेल कोटा दुपटीपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला तर रिटेल पोर्शन तिपटीपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता.

पतंजलीमधील प्रवर्तकांचा हिस्सा आता ८०.८२ टक्क्यांवरून ७३.८२ टक्क्यांवर आला आहे. यासह, कंपनीनं किमान ७५ टक्के पब्लिक शेअरहोल्डिंगची अट पूर्ण केली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १३ टक्क्यांनी वाढून २६४ कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा महसूलही १८ टक्क्यांनी वाढून ७,८७३ कोटी रुपये झाला आहे.

जीक्युजी पार्टनर मार्चमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा त्यांनी अडचणीत असलेल्या अदानी समूहात मोठी गुंतवणूक केली. २४ जानेवारी रोजी, अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये समभागावर समभागांच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले असले तरी त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. अशा परिस्थितीत जीक्यूजीनं अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी अदानी ग्रुपमध्ये दोनदा गुंतवणूक केली.