सलग १७ वेळा स्टार्टअपमध्ये अपयशी, परिस्थितीचा केला सामना; उभी केली ₹४००००००००००० ची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 08:52 AM2024-06-21T08:52:17+5:302024-06-21T09:09:27+5:30

Success Story : ज्याने अपयशाची चव चाखली नाही त्याला यशाचं मोल कधीच समजत नाही. काही निवडक लोक असतात जे अपयशाने खचून न जाता मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे अंकुश सचदेवा.

Success Story : हल्ली इंस्टंटच्या जमान्यात तरुण- तरुणींना सर्व काही इंस्टंट पाहिजे असतं. पेशन्स तर त्यांच्यामध्ये अजिबातच पाहायला मिळत नाही. बिझनेस असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो, ज्याने अपयशाची चव चाखली नाही त्याला यशाचं मोल कधीच समजत नाही. काही निवडक लोक असतात जे अपयशाने खचून न जाता मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात.

अंकुश सचदेवा यांना देखील उद्योगजगतात पाय रोवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. व्यवसाय क्षेत्रात मोठं यश मिळण्यापूर्वी अंकुश यांनी १७ वेळा स्टार्टपमध्ये हात आजमावले. पण एकापाठोपाठ एक स्टार्टअप अपयशी ठरले मात्र अंकुश यांनी हार मानली नाही. अखेरीस १८ व्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवलंच.

IIT कानपूरमधून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर अंकुश सचदेवा यांनी जगातील आघाडीची आयटी कंपनी म्हणून ओळख असलेल्या मायक्रोसॉफ्टमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

त्याच दरम्यान त्यांच्या मनात उद्योजक बनण्याचा विचार आला आणि मग त्यांनी त्यासाठी मेहनत सुरू केली. विशेष म्हणजे अंकुश यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

अंकुश यांच्या या प्रवासात त्यांना त्यांच्या दोन मित्रांची मोलाची साथ मिळाली. फरीद अहसन आणि भानु प्रताप सिंह या दोन आयआयटी मित्रांचीही मदत घेतली. या तीन मित्रांनी आपल्या हटके कल्पनेच्या जोरावर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा यूजर्सना वेगळा अनुभव येण्याकरिता शेअरचॅट नावाचं अ‍ॅप तयार केलं.

२०१५ मध्ये मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीची स्थापना करत अंकुश यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. साधारणत: ऑक्टोबर २०१५ मध्ये शेअर चॅट लाँच करण्यात आलं. या भारतीय सोशल मीडिया ॲपने अल्पावधीतच जगभर ओळख मिळवली.

विशेष बाब म्हणजे या अ‍ॅपचा अमेरिका, युरोप आणि इतर अनेक देशांमध्ये एक वेगळा यूजर बेस आहे. सध्या कंपनीची मार्केट व्ह्यॅल्यू ४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अंकुश सचदेवा हे शेअर चॅटचे सीईओ आहेत.