आधी कमावले, आता एका फटक्यात मस्क यांनी गमावले ८,७७,९७,७८,००,००० रुपये; अदानी-अंबानींची नेटवर्थ वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:22 AM2023-06-22T10:22:13+5:302023-06-22T10:37:00+5:30

मंगळवारी मोठी नेटवर्थमध्ये मोठी वाढ झालेल्या मस्क यांना बुधवारी मात्र मोठा फटका बसला.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांची कंपनी टेस्लानं भारतात मोठी गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते. यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली. यानंतर मस्क यांच्या नेटवर्थमध्ये 9.95 अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती.

मात्र बुधवारी त्यांनी एका झटक्यात आणखी संपत्ती गमावली. बुधवारी टेस्लाचे शेअर्स 5.46 टक्क्यांनी घसरले. यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती 10.7 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 8,77,97,78,00,000 रुपयांनी घसरली. मस्क यांची एकूण संपत्ती आता 232 अब्ज डॉलर्स आहे.

या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 95 अब्ज डॉलर्सनं वाढली आहे. मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आहेत. ते सोलारसिटीचे अध्यक्ष आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे मालक देखील आहेत.

बुधवारी जगातील टॉप 12 श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली, तर मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली. मस्क यांच्यानंतर लॅरी पेज यांच्या नेटवर्थमध्ये सर्वाधिक घट झाली. त्यांची एकूण संपत्ती 2.08 अब्ज डॉलरने घसरली.

त्याचप्रमाणे सेर्गेई ब्रिन यांनी 1.96 अब्ज डॉलर्स, स्टीव्ह बाल्मर 1.46 अब्ज डॉलर्स आणि जेफ बेझोस 1.02 अब्ज डॉलर्स गमावले. दुसरीकडे देशांतर्गत शेअर बाजारातील विक्रमी उच्चांकाचा फायदा अंबानी आणि अदानींना झाला. अंबानींची एकूण संपत्ती 33 कोटी डॉलर्सनं वाढली तर अदानींची एकूण संपत्ती 22.3 कोटी डॉलर्सनं वाढली.

232 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मस्क जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट 197 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जेफ बेझोस (149 अब्ज डॉलर्स) तिसऱ्या, लॅरी एलिसन (135 अब्ज डॉलर्स) चौथ्या, बिल गेट्स (132 अब्ज डॉलर्स) पाचव्या क्रमांकावर आहेत.

वॉरेन बफे (118 अब्ज डॉलर्स) सहाव्या, स्टीव्ह बाल्मर (116 अब्ज डॉलर्स) सातव्या, लॅरी पेज (110 अब्ज डॉलर्स) आठव्या, सर्गेई ब्रिन (105 अब्ज डॉलर्स) नवव्या आणि मार्क झुकरबर्ग (103 अब्ज डॉलर्स) दहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीत 88.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अंबानी 13 व्या क्रमांकावर आहेत आणि अदानी 61.6 अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह 21व्या क्रमांकावर आहेत.