150 वेळा अपयश आलं...अखेर उभारली 65,000 कोटींची कंपनी; आज प्रत्येकजण ओळखतो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 02:48 PM2024-02-11T14:48:20+5:302024-02-11T14:51:44+5:30

Success Story: आज देशातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, सर्वांनाच या ॲपबद्दल माहिती आहे.

Dream 11 Success Story: गेल्या काही वर्षांमध्ये देशात असंख्य स्टार्टअप्सची सुरुवात झाली. यातील अनेक स्टार्टअप्स खुप यशस्वी झाले. या स्टार्टअप्सना यशस्वी करण्यामागे त्या-त्या व्यक्तींनी कठोर मेहनत घेतली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टार्टअपची यशोगाथा सांगणार आहोत, जी आज हजारो कोटींची कंपनी बनली आहे. 'ड्रीम-11' (Dream11) या ऑनलाइन ॲपबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेलच. आम्ही तुम्हाला ड्रीम 11 चे संस्थापक आणि सीईओ हर्ष जैन यांची कहाणी सांगणार आहोत.

आज देशातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वांनाच या ॲपबद्दल माहिती आहे. या ॲपवर फँटसी क्रिकेट, हॉकी, फुटबॉल यासह अनेक खेळांवर बेटिंग केली जाते. याद्वारे अनेकांनी हजारो, लाखो रुपयांची कमाई केल्याचा दावा कंपनीच्या जाहिरातींमधून केला जातो. पण, अशाप्रकारची कंपनी उभी करण्याचा मार्ग सोपा नव्हता. या कंपनीच्या यशामागे दोन मित्र आहेत. हर्ष जैन आणि भावित सेठ या दोघांनी मिळून ड्रीम 11 ची सुरुवात केली.

2008 मध्ये IPL सुरू झाले, तेव्हाच हर्ष आणि भावित यांना ड्रीम 11 सुरू करण्याची कल्पना सुचली होती. 2008 मध्ये त्या दोघांनी स्पोर्टा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ड्रीम 11 ची स्थापना केली. दोघांनाही सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना निधीसाठी अनेक अडचणी आल्या.

निधी मिळवण्यासाठी दोन वर्षांत सुमारे 150 भांडवलदारांशी संपर्क साधला, परंतु कोणालाही त्यांची कल्पना आवडली नव्हती. कसेबसे त्यांनी 2012 मध्ये क्रिकेटप्रेमींसाटी फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. अनेक अडचणी आणि अपयशानंतर हर्ष आणि भावितच्या कंपनीला 2020 च्या IPLचे स्पॉन्सरशिप राईट्स मिळाले. इथून कंपनीचे अच्छे दिन सुरू झाले.

आज Dream 11 चे व्हॅल्युएशन रु. 65,000 कोटी ($8 बिलियन) पेक्षा जास्त असून, कंपनीचे 150 मिलियनहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत. आता या अॅपवर क्रिकेटसोबतच फुटबॉल, बास्केटबॉल आणि कबड्डीसह अनेक खेळांवर पैसे लावले जातात. सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीकडे 800 पेक्षा जास्त कर्मचारी होते. या स्टार्टअपने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 3841 कोटी रुपयांची कमाई केली. हर्ष जैन हे सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश म्हणूनही ओळखले जातात.