FASTag बाबत करुन घ्या हे महत्त्वाचं काम, अन्यथा २९ फेब्रुवारीनंतर टोलवर येईल मोठी समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:46 AM2024-02-28T08:46:09+5:302024-02-28T08:59:25+5:30

राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही समस्येशिवाय प्रवास करायचा असेल तर २९ फेब्रुवारीपर्यंत हे महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे.

FASTag KYC Latest Updates: तुम्ही तुमचं केवायसी (KYC) अपडेट केलं नसेल तर, २९ फेब्रुवारीनंतर तुमच्या समस्या वाढू शकतात. जर तुम्हाला एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गांवर कोणत्याही समस्येशिवाय प्रवास करायचा असेल तर २९ फेब्रुवारीपर्यंत तुमचं केवायसी अपडेट करावं लागेल. तुम्ही असं न केल्यास तुमचा फास्टॅग ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाईल.

मोठ्या प्रमाणात लोकांच्या वाहनांवर दोन किंवा अधिक फास्टॅग लावण्यात आलेले आहेत. यामुळे अनेकदा टोल कापताना टोल नाक्यांवर समस्या येतात. तर दुसरीकडे देशात मोठ्या प्रमाणात असेही लोक आहेत, ज्यांची कार दुसऱ्या नावावर आहे आणि फास्टॅग आणखी कोणाच्या नावे आणि मोबाईल नंबरवरून जारी करण्यात आले आहेत. यामुळेही मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

NHAI च्या सूत्रांनुसार, यावेळी केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्याची शक्यता खूपच कमी आहे. २० ते ३१ जानेवारी दरम्यान, मोठ्या संख्येनं लोकांनी त्यांचे केवायसी अपडेट केले. बँका आणि फास्टॅग वॉलेट सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीला केवायसी अपडेटची तारीख एक महिना वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण तेव्हापासून केवायसी अपडेट करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

एका वाहनात एकापेक्षा जास्त फास्टॅग जारी केल्यानं समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला सातत्यानं येत होत्या. अनेकदा टोल नाक्यांवर सिस्टम तो फास्टॅग रिड करतो किंवा गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारे तो फास्टॅग स्कॅन करतो, ज्याच्या वॉलेटमध्ये योग्य बॅलन्स शिल्लक नसतो. यावर टोल बॅरिअर उघडत नाही. यानंतर, ड्रायव्हर्स दुसरा फास्टॅग देतात आणि पुरेसा शिल्लक दाखवतात. फास्टॅग रीडरमधील त्रुटीचं कारण देऊन टोल बॅरिअर उघडतात.

नियमांनुसार फास्टॅग घेणाऱ्या व्यक्तीचं केवायसी अपडेट केलेलं असणं आवश्यक आहे. गाडीही त्या व्यक्तीच्या नावावर असली पाहिजे. सुरुवातीला ही सूट असेल की भलेही गाडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असेल, जी व्यक्ती फास्टॅग जारी करत आहे, त्याची केवायची असणं गरजेचं आहे.

तुम्ही ज्या कंपनीचा फास्टॅग घेतला आहे त्या कंपनीचे फास्टॅग वॉलेट ॲप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर फास्टॅगसह दिलेल्या मोबाइल नंबरसह लॉगिन करा आणि नंतर माय प्रोफाइलवर जा, तिथे केवायसी वर क्लिक करा. जर ते अपडेट केलं नसेल तर केवायसी फिल ऑप्शनवर क्लिक करा आणि मागितलेली माहिती एन्टर करा.

जर तुम्हाला ही माहिती ऑनालाइन अपडेट करायची असेल तर www.fastag.ihmcl.com वर जा. इथे तुमच्या रजिस्टर मोबाईलच्या मदतीनं लॉग इन करा. यानंतर डॅशबोर्ड मेन्यूमध्ये My Profile ऑप्शनवर जा. इकडे तुमचं केवायसी स्टेटस चेक करा. जर तुमचं केवायसी अपडेट केलंल नसेल तर सब सेक्शनमध्ये जा. इथे आवश्यक माहिती, जसं आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आणि फोटो अपलोड करा. यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.