पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:33 IST2025-11-28T10:28:43+5:302025-11-28T10:33:04+5:30

Crude Oil Prices : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, अशा बातम्या आपण अनेकदा ऐकतो. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत एका मिनरल वॉटरच्या बाटलीपेक्षाही स्वस्त होईल, असे तुम्ही कधी ऐकले आहे का?

जागतिक ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गनने असाच एक मोठा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासाठी हा खूप दिलासादायक ठरू शकतो.

जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, मार्च २०२७ पर्यंत ब्रेंट क्रूडची किंमत ३० डॉलर प्रति बॅरल पर्यंत खाली येऊ शकते. सध्या ब्रेंट क्रूडची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरलपेक्षा थोडी जास्त आहे. या हिशोबाने, जेपी मॉर्गनने किंमत ५०% पेक्षा जास्त घसरेल असा अंदाज वर्तवला आहे.

जर ३० डॉलर प्रति बॅरलच्या किमतीला भारतीय चलनात (९५ रुपये प्रति डॉलर) बदलले, तर १ बॅरलची किंमत : सुमारे २,८५० रुपये. एका बॅरलमध्ये १५९ लीटर कच्चे तेल असते. म्हणजे १ लीटर कच्च्या तेलाची किंमत फक्त १७.९० रुपये इतकी असेल.

याचा अर्थ, दिल्लीत साधारणपणे १८ ते २० रुपये प्रति लीटरने विकल्या जाणाऱ्या मिनरल वॉटरच्या बाटलीपेक्षाही कच्च्या तेलाची किंमत कमी होईल.

भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८६% कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे, तेलाच्या किमतीत झालेली ही मोठी घसरण भारताचे आयात बिल कमी करण्यास आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत करू शकते.

जगभरात तेलाचा वापर सतत वाढत असला तरी, किमती घसरण्याचे मुख्य कारण मागणीपेक्षा जास्त पुरवठा हे असेल. पुढील तीन वर्षांत नॉन-ओपेक+ देशांकडून (जसे की रशिया, मेक्सिको, कझाकिस्तान इ.) तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत तिप्पट वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

परिणामी २०२७ पर्यंत तेलाचा पुरवठा वापरापेक्षा जास्त राहील, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होतील. २०२५ मध्ये तेलाची मागणी ०.९ मिलियन बॅरल प्रति दिवस (mbpd) ने वाढून एकूण १०५.५ mbpd पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, तरीही पुरवठ्याची वाढ जास्त असेल.

जेपी मॉर्गनचा हा अंदाज जर खरा ठरला, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी कपात होऊन सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.