वीजेची मागणी पूर्ण करताना कंपन्यांची दमछाक, पण कोळसा टंचाईची नेमकी कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 09:19 AM2022-05-04T09:19:12+5:302022-05-04T09:29:51+5:30

कोळसा हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. उष्णतेमुळे विजेची मागणी वाढली आहे आणि ही मागणी पुरी करताना वीज कंपन्यांची दमछाक झाली आहे.

कोळसा हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. उष्णतेमुळे विजेची मागणी वाढली आहे आणि ही मागणी पुरी करताना वीज कंपन्यांची दमछाक झाली आहे. विजेच्या निर्मितीसाठी लागणारा कोळसाच रुसून बसला आहे.

कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने देशभरात वीजसंकट ओढवले आहे. असे हे सर्व चक्र आहे. या पार्श्वभूमीवर कोळशाची टंचाई का आहे, जाणून घेऊ या...

कोळशाची टंचाई का आहे? देशातील बहुतांश वीजप्रकल्प औष्णिक स्वरूपाचे आहेत. औष्णिक वीजप्रकल्प म्हणजे कोळसा जाळून वीज तयार करणे. सध्या देशभरातील १७३ औष्णिक वीजप्रकल्पांपैकी १०८ केंद्रांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई आहे.

सध्या विजेची मागणी उच्चांकी स्तरावर आहे. असे असताना कोळसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही कोळशाची किंमत वाढल्याने काही प्रकल्पांना वीजनिर्मितीत अडथळे येत आहेत.

आता होतेय काय? हे आपण जाणून घेऊ. कोळसा खाणींतून निर्माण होणारा कोळसा वीजप्रकल्पांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रवासीगाड्या रद्द करून त्या मार्गावर कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्या चालवत आहे.

कोळसा टंचाई दूर करण्यासाठी काही राज्ये आंतरराष्ट्रीय बाजारातून कोळसा आयात करू पाहात आहेत. मे-जूनमध्ये विजेची मागणी वाढणे अपेक्षित असल्याने कोळशाची तूट भरून काढण्यावर भर दिला जात आहे. वीजवितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांना महागडा कोळसा घेऊन वीजनिर्मिती परवडत नाही.

महाराष्ट्र आणि झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये कोळसा कंपन्यांच्या थकबाकी मोठ्या प्रमाणात आहेत. कोळशाची वाढलेली मागणी आणि अपुरा पुरवठा यांमुळे वीजनिर्मितीत अडचणी येत आहेत.