Gold Rate Today: आज आंतरराष्ट्रीय बाजारात ४% ची तेजी, पाहा Comex वर किती आहे सोन्याचा भाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:48 IST2026-03-26T10:27:56+5:302026-03-26T10:48:08+5:30
Comex Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून घसरण सोसणाऱ्या सोने-चांदीच्या दरांनी अचानक जोरदार पुनरागमन केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून भारतापर्यंत दोन्ही ठिकाणी किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. पाहा काय आहेत नवे दर.

Comex Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून घसरण सोसणाऱ्या सोने-चांदीच्या दरांनी अचानक जोरदार पुनरागमन केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून भारतापर्यंत दोन्ही ठिकाणी किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. डॉलरचं कमकुवत होणं आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण हे याचं सर्वात मोठं कारण मानलं जात आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याच्या संकेतांनीही बाजाराला दिलासा दिला असून, गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा सोने-चांदीकडे वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कॉमेक्स गोल्डच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. ताज्या आकडेवारीनुसार, सोनं सुमारे ४५७० डॉलर्सच्या आसपास ट्रेड करत असून त्यात ३.८% वाढ झाली आहे. सोन्यानं ४६०१ डॉलर्सचा उच्चांक गाठला, तर दिवसाचा नीचांक सुमारे ४४५८ डॉलर्स राहिला. म्हणजेच एकाच दिवसात किमतीत मोठा चढ-उतार पाहायला मिळाला, परंतु कल वाढीचा राहिला.

कॉमेक्स गोल्डच्या ताज्या डेटांनुसार, बाजार सध्या संमिश्र कल दाखवत आहे. शॉर्ट टर्म चार्टमध्ये विक्रीचा संकेत मिळत असून त्यामुळे थोडी घसरण होऊ शकते. मात्र, एक तास आणि एक दिवसाच्या हिशोबात 'बाय'चा संकेत आहे, म्हणजेच मोठ्या टाइमफ्रेममध्ये तेजीचा कल कायम आहे.

सपोर्ट लेव्हल ४३३९ डॉलर्स ते ४४३६ डॉलर्स दरम्यान आहे, तर रेझिस्टन्स ४५३२ डॉलर्स ते ४६२९ डॉलर्सच्या आसपास दिसत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, किंमत या स्तरांच्या दरम्यान खाली-वर होऊ शकते, परंतु सध्या मोठ्या चित्रात बाजार मजबूत दिसत आहे.

भारतातही सोन्याच्या किमतींनी जबरदस्त रिकव्हरी दाखवली आहे. सोमवारी जिथे MCX वर सोनं सुमारे ₹१,२९,५९५ प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरलं होतं, तिथे दोन दिवसांतच ते वाढून ₹१,४४,५७० वर पोहोचलं. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत सुमारे ₹१५,००० ची तेजी पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा सोन्याकडे वेधलं गेलं आहे.

मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे कमोडिटी रिसर्च हेड हरीश व्ही यांच्या मते, MCX वर सोन्यात सुमारे ४% तेजी आणि चांदीतील उसळीचे मुख्य कारण कमकुवत डॉलर आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण हे आहे. यामुळे महागाई आणि व्याजदरांबाबतची चिंता थोडी कमी झाली असून त्याचा फायदा सोने-चांदीला मिळाला आहे. ऊर्जा बाजारातील घसरणीमुळे जागतिक स्तरावर व्याजदर वाढण्याची अपेक्षाही कमी झाली आहे, ज्यामुळे या मौल्यवान धातूंना आधार मिळालाय.

तसंच, अमेरिकेकडून इराणसोबतचा तणाव संपवण्याच्या प्रयत्नांच्या बातम्यांनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला असून 'सेफ हेवन' म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. अलीकडील घसरणीनंतर सोन्यात 'व्हॅल्यू बाइंग' पाहायला मिळत आहे, म्हणजेच किमती खाली आल्यावर गुंतवणूकदार पुन्हा खरेदी करत आहेत.

हरीश व्ही यांच्या मते, भविष्यातही थोडीफार तेजी राहू शकते, परंतु जुना उच्चांक ओलांडणं सोपं नसेल. जर डॉलर पुन्हा मजबूत झाला, तर सोन्याच्या किमतीवर दबाव येऊ शकतो.

INVasset PMS चे बिझनेस हेड हर्षल दसानी यांच्या मते, भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोने अजूनही एक चांगला पर्याय आहे, विशेषतः जेव्हा रुपया कमकुवत होत आहे, कच्चे तेल महाग आहे आणि परदेशी गुंतवणूकदार पैसा काढून घेत आहेत. एकदाच मोठी गुंतवणूक करण्याऐवजी हळूहळू हिश्श्यांमध्ये गुंतवणूक करा, तसंच MCX वर ₹१,३८,००० ते ₹१,४०,००० च्या आसपास घसरण झाल्यास खरेदी करणं अधिक चांगलं राहील, असं ते म्हणाले. बाजार अस्थिर असल्यानं सोनं पूर्णपणे सुरक्षित नाही आणि एका आठवड्यात ५-८% पर्यंत घसरण पाहायला मिळू शकते, असंही त्यांनी नमूद केलं.

















