Axis Bank मध्ये सामील झाला Citi Bank चा रिटेल बिझनेस, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 01:18 PM2023-03-01T13:18:48+5:302023-03-01T13:27:41+5:30

१ मार्च २०२३ हा दिवस अनेक मोठे बदल घेऊन आला आहे. सिटी बँक आणि ॲक्सिस बँकेसंदर्भात आपल्याला मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

१ मार्च 2023 अनेक बदल (Changes From 1st March) घेऊन आला आहे. यामध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. दरम्यान, आजपासून आणखी एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे, जो सिटी बँकेच्या ग्राहकांशी संबंधित आहे.

वास्तविक, भारतातील सिटी बँकेचा रिटेल व्यवसाय आता ॲक्सिस बँकेत सामील झाला आहे. याच्याशी संबंधित सर्व ग्राहकांना आता ॲक्सिस बँकेच्या सुविधांचा वापर करता येणार आहे. सिटी बँकेच्या किरकोळ व्यवसायात क्रेडिट कार्ड, गृह आणि वैयक्तिक कर्ज, रिटेल बँकिंग, विमा सेवा यांचा समावेश आहे.

२०२१ मध्ये सिटीग्रुपने भारतासह १३ देशांमधील रिटेल बँकिंग ऑपरेशन्समधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत भारतातील बँकाचा व्यवसाय ॲक्सिस बँकेत विलीन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

१ मार्च रोजी, यासह सिटी बँकेचे रिटेल ग्राहक ॲक्सिस बँकेत ट्रान्सफर झाले. भारतात १९०२ पासून अस्तित्वात असलेली सिटी बँक १९८५ पासून ग्राहक बँकिंग व्यवसायात कार्यरत आहे. त्यांच्या देशात ३५ शाखा आहेत आणि सुमारे ४ हजार कर्मचारी ग्राहक बँकिंग व्यवसायात कार्यरत आहेत.

सिटी बँकेच्या वेबसाईटवर अपडेट केलेल्या माहितीनुसार, आतापासून सर्व शाखा, एटीएमसह किरकोळ व्यवसायाशी संबंधित सर्व सेवा ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून पुरवल्या जातील. यासोबतच या व्यवसायाशी संबंधित सर्व ग्राहक आणि कर्मचारी देखील ॲक्सिस बँकेचा भाग बनतील.

म्हणजेच १ मार्च २०२३ पासून सिटी बँक इंडियाचे सुमारे ३० लाख ग्राहक देखील अॅक्सिस बँकेत जातील. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, अॅक्सिस बँकेकडे सुमारे २.८५ कोटी बचत खाती, २.३ लाखांहून अधिक बरगंडी ग्राहक आणि १.०६ कोटी कार्ड ग्राहक असतील. अॅक्सिस बँकेच्या कार्ड ग्राहकांची संख्या सुमारे ३१ टक्क्यांनी वाढेल.

खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेने अमेरिकन बँकिंग कंपनी सिटी ग्रुपचा भारतीय रिटेल व्यवसाय १२,३२५ कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी करार केला होता. परंतु बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, ११,६०३ कोटी रुपयांना अंतिम रूप देण्यात आले आहे. तथापि, सिटीबँकच्या ग्राहकांना ॲक्सिस बँकेत सामील झाल्यानंतरही सर्व बँकिंग आणि कार्ड लाभांचा लाभ घेता येणार आहे. बँकेच्या वेब साईटवरही याचा उल्लेख करण्यात आला आहे.

सिटी बँकेने एप्रिल २०२२ मध्ये सांगितले होते की ते ग्लोबल स्ट्रॅटेजी अंतर्गत भारतातून आपला ग्राहक बँकिंग व्यवसाय गुंडाळण्याची तयारी करत आहे. तथापि, या करारानंतरही बँक इन्स्टीट्युशनल बँकिंग व्यवसाय आणि ग्लोबल बिझनेस सपोर्ट सेंटरद्वारे भारतात उपस्थित राहील. सिटी बँकेची मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम येथे ग्लोबल बिझनेस सपोर्ट सेंटर्स आहेत.