अमिताभ, शाहरुख आणि हृतिक 'अ‍ॅक्टिंग'शिवाय कमावतायेत कोट्यवधी; 'या' क्षेत्रात कलाकारांची मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:55 IST2025-12-03T11:51:04+5:302025-12-03T11:55:14+5:30

Real Estate investment : बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आता अभिनयाच्या कमाईवर अवलंबून न राहता रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे खेळाडू बनले आहेत. मुंबईच्या प्राइम लोकेशन्सवरील कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टीजमध्ये त्यांनी केलेली मोठी गुंतवणूक, त्यांना शूटिंगशिवायही दरमहा कोट्यवधींची 'पॅसिव्ह इन्कम' मिळवून देत आहे.

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी श्री लोटस डेव्हलपर्ससारख्या प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये प्रत्येकी सुमारे १० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. हा ट्रेंड दर्शवतो की, चित्रपटसृष्टीतील कमाईसोबतच आता ऑफ-स्क्रीन व्यवसाय मॉडेलवर जोर वाढला आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि राकेश रोशन यांनी नुकतेच अंधेरी वेस्ट येथे ४ कमर्शियल युनिट्स १०.९० कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. अंधेरी वेस्ट हे मीडिया आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचे केंद्रस्थान असल्याने भविष्यात या प्रॉपर्टीचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पॅसिव्ह इन्कम मिळणे. अनेक मोठे कलाकार स्वतःच्या मालकीचे फ्लॅट्स आणि ऑफिस स्पेस भाड्याने देऊन मोठी मासिक कमाई करत आहेत.

अभिनेता जॉन अब्राहम याने वांद्रे येथील आपलं एक अपार्टमेंट लीजवर दिलं आहे. या एका फ्लॅटमधून त्याला दरमहा तब्बल ७.५० लाख रुपये भाडे मिळत आहे.

९० च्या दशकातील अभिनेत्री करिश्मा कपूर हिनेही वांद्रे येथील तिचा २२०० स्क्वेअर फुटांचे अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. या अपार्टमेंटसाठी तिला दरमहा ५.५१ लाख रुपये भाडे मिळते, जी अनेक सामान्य नोकरदारांच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त आहे.

राकेश रोशन यांनी नुकतेच त्यांच्या पत्नीसोबत २० कोटी रुपये खर्चून ५ ऑफिस स्पेस खरेदी केले आहेत, जे त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत बनले आहेत. यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओला मोठी स्थिरता मिळाली आहे.

अजय देवगन आणि काजोल यांनी मुंबईबाहेरही गोवा येथे एका आलिशान ५ बीएचके विलामध्ये गुंतवणूक केली आहे. हा विला भाड्याने दिल्यास एका दिवसासाठी ५०,००० रुपये भाडे आकारले जाते.

काजोलने मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेला आपली एक ऑफिस स्पेस भाड्याने दिली आहे. या एका प्रॉपर्टीमधून तिला दरमहा ७ लाख रुपये मासिक उत्पन्न मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील 'जलसा' आणि 'प्रतीक्षा' हे बंगले तर प्रसिद्ध आहेतच. पण ओशिवारा येथील 'लोटस सिग्नेचर' बिल्डिंगमध्ये असलेली त्यांची १०,१८० स्क्वेअर फूटची कमर्शियल प्रॉपर्टी त्यांना मोठी मासिक कमाई मिळवून देते.

केवळ जुनेच नाही, तर अजय देवगन, एकता कपूर, टायगर श्रॉफ, सारा अली खान आणि राजकुमार राव यांसारख्या नवीन पिढीतील कलाकारांनीही अशाच प्रकारे रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करून दीर्घकालीन आर्थिक नियोजन सुरू केले आहे.