भारतातील सर्वात महागडा गायक अरिजीत सिंग किती संपत्तीचा मालक; २ तासांच्या शो साठी किती घेतो पैसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 09:11 IST2026-01-28T08:53:48+5:302026-01-28T09:11:27+5:30
Arijit Singh Net Worth: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यानं एक मोठा निर्णय घेत आता कोणत्याही नवीन गाण्यासाठी प्लेबॅक सिंगिंग न करण्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊया अरिजीत सिंग किती संपत्तीचा आहे मालक.

Arijit Singh Net Worth: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यानं एक मोठा निर्णय घेत आता कोणत्याही नवीन गाण्यासाठी प्लेबॅक सिंगिंग न करण्याची घोषणा केली आहे. त्यानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

भारतीय संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अरिजीतनं श्रोत्यांच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आपण आता प्लेबॅक सिंगिंगमधून थोडा ब्रेक घेत आहोत, असं त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय.

आपल्या आवाजानं लाखो हृदयांवर राज्य करणारा अरिजीत सिंग हा भारतातील सर्वात महागडा गायक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन तासांच्या एका लाईव्ह परफॉर्मन्ससाठी तो १४ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो. इतकं मोठे यश मिळवूनही अरिजीतचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे. तो आपलं खाजगी आयुष्य प्रसिद्धीच्या झोतात आणण्याऐवजी साधं जीवन जगण्याला पसंती देतो.

रिपोर्ट्सनुसार, अरिजीत सिंगची एकूण संपत्ती ४१४ कोटी रुपये आहे. यामध्ये नवी मुंबईतील ८ कोटी रुपयांचं आलिशान घर आणि ३.४ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेंज रोव्हर आणि मर्सिडीज सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

मात्र, इतकी संपत्ती असूनही त्याचं मुख्य घर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील जियागंजमध्ये आहे. तिथे तो एका साध्या घरात राहतो. त्याच्या त्या घरात एक स्टुडिओ देखील आहे.

अरिजीत आपल्या मूळ गावी एक स्वस्त रेस्टॉरंट चालवतो, ज्याचं नाव Heshel आहे. तिथे फक्त ४० रुपयांत जेवण मिळतं. गायनासोबतच तो ब्रँड एंडोर्समेंट आणि कोलॅबोरेशनमधूनही चांगली कमाई करतो. त्याने कोका-कोला आणि सॅमसंग सारख्या मोठ्या ब्रँड्सचं प्रतिनिधित्व केलं आहे.

अरिजीत सिंगच्या कमाईचा मोठा हिस्सा हा त्याच्या कॉन्सर्ट्स आणि लाईव्ह शोजमधून येतो. Insider.in नुसार, भारतातील त्याच्या कॉन्सर्टच्या तिकिटांच्या किमती २,००० रुपयांपासून ८०,००० रुपयांपर्यंत असतात. ही किंमत शहर आणि जागेवर अवलंबून असते. पुणे येथील एका शोमध्ये प्रीमियम लाउंज तिकिटाची विक्री १६ लाख रुपयांपर्यंत झाली होती. २ तासांच्या परफॉर्मन्ससाठी तो १४ कोटी रुपये चार्ज करतो.

















