टाटाला मिळणार तगडी स्पर्धा? बिर्ला समूह पुन्हा एकदा आपल्या जुन्या व्यवसायात परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:03 IST2026-03-06T13:48:15+5:302026-03-06T14:03:12+5:30
Birla Group : आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी पुन्हा एकदा 'लोहखनिज' व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. २०२२ मध्ये हा व्यवसाय थांबवल्यानंतर, आता पुन्हा एकदा समूह या क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहे.

बिर्ला समूहाची सिंगापूरस्थित 'आदित्य बिर्ला ग्लोबल ट्रेडिंग' ही उपकंपनी या लोहखनिज व्यवसायाचे कामकाज पुन्हा सुरू करणार आहे. ही कंपनी मूळच्या आदित्य बिर्ला समूहाचाच एक भाग आहे, ज्यांच्याकडे हिंडाल्कोसारखी मोठी ॲल्युमिनियम कंपनी देखील आहे.

कंपनीने २०२२ मध्ये आपले लोहखनिज ऑपरेशन्स काही कारणांमुळे बंद केले होते. मात्र, आता जागतिक बाजारातील बदलती परिस्थिती आणि संधी लक्षात घेऊन कंपनीने पुन्हा या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपला व्यवसायाचा पोर्टफोलिओ अधिक वैविध्यपूर्ण करण्यासाठी आणि व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी कंपनी विशेषतः 'चीन'च्या विशाल बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार आहे.

सध्या ही कंपनी प्रामुख्याने ऊर्जा, धातू आणि शेतीविषयक उत्पादनांच्या व्यापारात सक्रिय आहे. आता लोहखनिजाचा समावेश झाल्यामुळे कंपनीच्या व्यापाराचा विस्तार अधिक मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

लोहखनिजाच्या व्यवसायात सध्या टाटा समूहाचे वर्चस्व आहे. टाटा स्टील ही भारताची दुसरी सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी आहे. बिर्ला समूहाच्या एन्ट्रीमुळे टाटा स्टीलला या क्षेत्रात आता मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.

टाटा स्टीलकडे झारखंड आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये स्वतःच्या मोठ्या खाणी आहेत. तसेच, फेरोक्रोम आणि मँगेनीज मिश्रधातूंच्या उत्पादनातही टाटा स्टीलचे जागतिक स्तरावर मोठे नाव आहे.

बिर्ला समूहाच्या पुनरागमनामुळे भारतीय लोहखनिज आणि धातू क्षेत्रात आता मोठे बदल अपेक्षित आहेत. दोन्ही दिग्गज समूहांमधील या स्पर्धेचा फायदा भारतीय धातू उद्योगाला होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

















