बँकिंग संकट! भारतातील 20 लाख कोटींचा बिझनेस धोक्यात, लाखो नोकऱ्यांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:39 PM2023-03-21T12:39:13+5:302023-03-21T13:02:27+5:30

जगभरातील तज्ज्ञांनी केले सावध, टीसीएस, इन्फोसिस आणि माईंडट्रीने प्रतिक्रिया देणे टाळले....

अमेरिका आणि युरोपवरील बँकिंग संकट वाढतच चालले आहे. शेकडो बँका बुडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. असे असताना भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारताला सोनेरी दिवस दाखविणाऱ्या आयटी सेक्टरवर या मंदीचे ढग कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील दोन बँका बुडाल्या आहेत. तर युरोपची सर्वात मोठी बँक क्रेडिट सुइसची देखील हालत खराब झाली आहे. या बँकांना आयटी सुविधा पुरविणारे भारतातील आयटी सेक्टर धोक्यात आले आहे. आयटी बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट इंडस्ट्रीवर मंदीचा कहर बरसणार असल्याचे अॅनालिस्टचे म्हणणे आहे.

ही इंडस्ट्री 245 अब्ज डॉलर्सची आहे. या इंडस्ट्रीला ४१ टक्के येणारा महसूल हा बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स सेक्टरमधून येतो. जगातील मोठमोठ्या बँका बुडाल्यामुळे या सेक्टरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. प्रोजेक्ट बंद पडणार आहेत. तसेच नवीन प्रोजेक्टही मिळणार नाहीत.

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी या बँका त्यांच्या टेक बजेटमध्ये कपात करू शकतात. तसेच डील्स रद्दही करू शकतात. जर हे संकट आणखी गडद झाले तर त्याचा सर्वात मोठा फटका टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एलटीआय माईंड ट्री या कंपन्यांना सर्वाधिक बसणार आहे.

या कंपन्यांचा अमेरिकेच्या आर्थिक कंपन्यांशी सर्वात मोठा व्यापार आहे. HfS Research चे फाऊंडर फिल फेर्श्ट यांनी याबाबत सावध केले आहे. अमेरिकेच्या स्थानिक बँकांची हालत वाईट झाली आहे. यामुळे या बँकांना सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यात टीसीएस, इन्फोसिस देखील आहे.

मी या आठवड्यात एका आयटी कंपनीच्या सीईओसोबत बोललो आहे. त्यांनी पूर्ण सेक्टरमध्ये खळबळ उडाली असल्याचे म्हटले आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि माईंडट्रीने या संबंधी उत्तर दिलेले नाहीय, असे फेर्श्ट यांनी म्हटले आहे.

जगभरातील रिटेल बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यात उत्तर अमेरिकेतील बँका आघाडीवर आहेत. वित्तीय सल्लागार कंपनी सेलेंटच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये या बँकांचे आयटी बजेट $ 82 अब्ज होते, तर जागतिक बजेट $ 250 अब्ज होते.

टेक बजेटवर बँकांच्या खर्चाचा भारतीय आयटी कंपन्यांना खूप फायदा झाला होता. IT सल्लागार संशोधन संस्था एव्हरेस्ट ग्रुपचे संस्थापक पीटर बेंडर-सॅम्युअल यांच्या नुसार उत्तर अमेरिकेतील प्रादेशिक बँकांशी भारतीय कंपन्यांचा मोठ्या डील आहेत. येत्या काही काळात बँकिंग संकटाचा परिणाम त्यांच्या BFSI वाढीवर होईल.

एचसीएल टेक्नोलॉजीजचे माजी सीईओ विनीत नायर यांनी सांगितले की, पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे. परंतू अनिश्चिततेच्या वातावरणात नवीन प्रोजेक्टवर परिणाम होईल. यामुळे खर्चाचा दबाव वाढेल. यामुळे आउटसोर्सिंग वाढेल व सध्याच्या डीलवरही नव्याने तोलभाव केला जाऊ शकतो.

हा खर्च कमी करण्यासाठी किंवा नुकसान टाळण्यासाठी आयटी कंपन्या एआयची मदत घेतली. यामुळे लाखो नोकऱ्यांवर परिणाम जाणवणार आहे. जेव्हा या कंपन्या मार्च तिमाहीचा निकाल जाहीर करतील तेव्हा त्यांना गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे, असेही नायर म्हणाले.