EPFO कडून पुन्हा दिलासा, हायर पेन्शन निवडण्यासाठी डेडलाईन वाढवली; 'या' तारखेपर्यंत संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:36 AM2023-06-27T10:36:01+5:302023-06-27T10:45:45+5:30

ईपीएफओच्या (EPFO) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ईपीएफओच्या (EPFO) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO नं हायर पेन्शन (Higher Pension) निवडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याची मुदत २६ जून २०२३ रोजी संपणार होती. परंतु आता ती वाढवण्याचा निर्णय घेत दिलासा देण्यात आलाय.

ईपीएफओच्या हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जून रोजी संपणार होती. परंतु हा पर्याय स्वीकारण्यासाठी पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता ११ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या स्कीम अंतर्गत सर्व पात्र व्यक्तींना आपले अर्ज दाखल करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एपीएफओनं ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शनधारक/सदस्यांकडून पर्याय/संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी अर्ज प्राप्त करण्याची व्यवस्था केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात निर्णय दिला होता.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की जे कर्मचारी ०१.०९.२०१४ पूर्वी किंवा ०१.०९.२०१४ ला EPF चा भाग होते परंतु उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करू शकले नाहीत ते चार महिन्यांत नवीन पर्याय निवडू शकतात. यानंतर, अर्जाची अंतिम मुदत ३ मे २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

हायर पेन्शनशी संबंधित EPFO ​​चं परिपत्रक पाहता, ज्या कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपये किंवा ६५०० रुपयांच्या पूर्वीच्या वेतन मर्यादेपेक्षा जास्त वेतन योगदान दिलं आणि EPS-95 चे सदस्य असताना सुधारित योजनेसह EPS अंतर्गत निवड केली, ते उच्च पेन्शनसाठी पात्र असणार आहेत.

नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं employees Pension (Amendment) Scheme 2014 कायम ठेवली होती. २२ ऑगस्ट २०१४ च्या ईपीएस तरतुदींमध्ये दुरुस्ती केल्यानंतर पेन्शनसाठी सॅलरी कॅप ६५०० रुपयांवरून वाढवून १५ हजार रुपये महिना करण्यात आली. यासोबतच सदस्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाचे ८.३३ टक्के कॉन्ट्रिब्युट करण्याची परवानगी दिली होती.

यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा. त्यानंतर Pension on Higher Salary या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवं पेज सुरू होईल आणि क्लिक हियरचा पर्याय दिसेल.

ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला युएएनसह अन्य माहिती विचारली जाईल. त्यानंतर दिलेल्या जागेत युएएन, नाव, डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड आणि आधार लिंक्ड मोबाइल टाका. त्यानंतर व्हेरिफिकेनसाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, त्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय करता येईल.