जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत, अनिल अंबानींना विकावे लागलेले पत्नीचे दागिने; शिखरावरून शून्यावर येण्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 08:45 AM2024-04-04T08:45:50+5:302024-04-04T09:03:30+5:30

आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत.

जेव्हा दिग्गज उद्योजक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या निधनानंतर कंपनी रिलायन्सची विभागणी झाली तेव्हा अनिल अंबानींकडे (Anil Ambani) रिलायन्स इन्फोकॉम आली. तर मुकेश अंबानींना पेट्रोकेमिकल्स मिळाले. दोघांना समान वाटा मिळाला, पण आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत.

एक काळ असा होता की अनिल अंबानी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक होते, पण आज स्थिती अशी आहे की ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. बँकांच्या प्रचंड ओझ्याखाली असलेले अनिल अंबानी तब्बल ४९ वेळा डिफॉल्टर झाले आहेत.

रिलायन्सच्या विभाजनानंतर काही वर्षे कंपनी चांगली चालली, पण नंतर अनिल अंबानी यांचं साम्राज्य कोसळत गेलं. अनिल अंबानींची आरकॉम दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कंपनीचे कर्ज वाढू लागलं. पाहूया नक्की त्यांनी कोणत्या चुका केल्या ज्यामुळे त्यांच्यावर आज ही परिस्थिती उद्भवली आहे.

अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात व्यवसायावरून विभागणी झाली. मुकेश अंबानींना जुनी पेट्रोकेमिकल्स मिळाली, तर अनिल अंबानींना नवीन काळातील दूरसंचार, फायनॅन्स आणि ऊर्जा व्यवसाय मिळाला. अनिल अंबानींना रिलायन्सच्या मौल्यवान आणि नव्या युगातील कंपन्या मिळाल्या, पण ते कमाल दाखवू शकले नाहीत.

अनिल अंबानी यांनी रिलायन्स टेलिकॉमच्या संदर्भात अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या, पण नियोजन नीट झाले नाही. त्यांना टेलिकॉम, पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राचा राजा व्हायचे होते, पण आज त्यांच्या कंपन्या दिवाळखोर झाल्या आहेत.

अनिल अंबानी एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात उड्या घेत होते, पण अंमलबजावणीतील त्रुटींमुळे त्यांचे पैसे त्या व्यवसायांमध्ये अडकले. ते नवीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवत होते, त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढत होता. त्यानंतर कर्जही त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले. २०१९ पर्यंत अनिल अंबानींच्या कंपन्यांवरील एकूण कर्जाचा बोजा १.७३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

अनिल अंबानींच्या कंपन्या एकेकाळी यशाच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. २००८ मध्ये अनिल अंबानींच्या कंपन्यांचं बाजारमूल्य ४ लाख कोटींच्या पुढे गेलं होतं. २०१९ मध्ये हे मूल्य केवळ २३९१ कोटी रुपयांवर घसरलं. अनिल अंबानी बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात होते.

१० वर्षांपूर्वीपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले अनिल अंबानी आता याच्या जवळपासही नाहीत. त्यांच्या कंपनीकडूनच दिवाळखोरीचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉमने स्वतःला दिवाळखोर घोषित केलं.

२००८ मध्ये, अनिल अंबानी ४५ अब्ज डॉलर्ससह जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक होते. २०१९ मध्ये, ते फोर्ब्सच्या यादीत भारतात ७० व्या क्रमांकाच्याही पुढे होते. जगातील अब्जाधीशांमध्ये त्यांचा क्रमांक १३४९ व्या क्रमांकावर होता. अनिल अंबानींकडे १.७ अब्ज डॉलर शिल्लक आहेत. अनिल अंबानींनी त्यांच्या अनेक चुकांमुळे सर्वकाही गमावलं.

अनिल अंबानी यांचं नेटवर्थ शून्य झालं होतं. त्यांना वकिलांची फी भरण्यासाठी आपल्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले होते. आपल्याकडे एका कारशिवाय काहीही नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. फेब्रुवारी २०२३ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती २५० कोटी रुपये होती. त्यांच्याकडे मुंबईत एक १७ मजली घर आहे.