Coronavirus : महासाथीदरम्यान TATA यांचा डॉक्टर्स, परिचारीकांना मदतीचा हात; देशांतर्गत मोफत विमान प्रवासाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:31 PM2021-04-26T15:31:10+5:302021-04-26T15:41:35+5:30

डॉक्टर्स, परिचारीकांना देशांतर्गत मोफत प्रवासाची घोषणा Air Vistara कडून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. सातत्यानं देशात ३ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची दररोज नोंद होत आहे.

दरम्यान, एअर विस्तारानं (Air Vistara) डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर्स आणि परिचारिकांना देशांतर्गत मोफत विमान प्रवास देणार असल्याची घोषणा एअर विस्ताराकडून करण्यात आली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटकी ऊषा पाधी यांना एअर विस्तारानं यासंदर्भातील एक पत्र पाठवलं आहे.

आम्ही संकटकाळात सरकारी संघटना, रुग्णालयांना एअरलॉजिस्टीक सुविधा देण्यास मदत करू इच्छितो असं त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

आम्ही या संदर्भात सरकारी मान्यताप्राप्त संस्था आणि केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित संस्थांकडून अशा अर्जांचे स्वागत करतो. आमच्या उड्डाणांमध्ये उपलब्ध असलेल्या जागेनुसार जास्तीत जास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

ऊषा पाधी यांनीही आपल्या ट्विटमध्ये एअर विस्ताराच्या या पत्राचा हवाला देत म्हटलंय की, सरकारी संस्था आणि रुग्णालयांची तातडीची गरज भागविण्यासाठी विस्तारा हवाई वाहतुकीची सुविधा देण्यास तयार आहेत.

याव्यतिरिक्त, कंपनीने कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांकडून विनामूल्य हवाई प्रवासाचा प्रस्ताव दिला आहे. आपण एकत्र या संकटाशी लढा देऊ, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

दरम्यान, विमानातील जागांची उपलब्धता पाहत आम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जागा देणार असल्याचंही विस्तारानं आपल्या पत्रकात नमूद केलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडताना दिसत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत.