अक्षय कुमारने मुंबईतील २ आलिशान फ्लॅट्स विकले! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ९० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:51 IST2025-07-28T14:30:04+5:302025-07-28T14:51:25+5:30
Akshay Kumar properties : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने विकलेल्या दोन्ही मालमत्ता ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम प्रोजेक्ट स्काय सिटीमध्ये आहेत. हा सुमारे २५ एकरमध्ये पसरलेला एक रेडी-टू-मूव्ह-इन निवासी प्रकल्प आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा फक्त चित्रपटांतूनच नव्हे, तर रिअल इस्टेट गुंतवणुकीतूनही करोडोंची कमाई करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
अक्षयने मुंबईतील बोरिवली पूर्व भागात असलेल्या एका प्रीमियम निवासी प्रकल्पातील त्याच्या दोन आलिशान मालमत्ता ७.१० कोटी रुपयांना विकल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी वेबसाइट igrmaharashtra.gov.in वरून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मालमत्ता जून २०२५ मध्ये नोंदणीकृत झाल्या आहेत.
अक्षय कुमारने विकलेल्या दोन्ही मालमत्ता ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम प्रोजेक्ट 'स्काय सिटी'मध्ये आहेत. हा सुमारे २५ एकरमध्ये पसरलेला एक भव्य निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात ३ बीएचके, ३ बीएचके+स्टुडिओ आणि डुप्लेक्स अपार्टमेंटचा समावेश आहे.
या मालमत्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असल्याने त्या खास बनतात, कारण इथे हिरवीगार निसर्गरम्यता आणि शांतता मिळते. शिवाय, गोरेगाव आणि मालाडसारख्या कॉर्पोरेट हब जवळ असल्याने शहरी जीवनाशीही त्यांची उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे. बोरिवली पूर्व हा मुंबईतील सर्वात पसंतीच्या निवासी क्षेत्रांपैकी एक आहे, जिथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, मेट्रो मार्ग ७ आणि उपनगरीय रेल्वेने उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
अक्षय कुमारने ५.७५ कोटींना विकलेला पहिला फ्लॅट १,१०१ चौरस फूट कार्पेट एरियाचा आहे आणि त्याला दोन कार पार्किंगची सुविधा आहे. अक्षयने हा फ्लॅट २०१७ मध्ये खरेदी केला होता. त्यावेळी त्याने ३४.५० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले होते. या काही वर्षांत या फ्लॅटची किंमत ९० टक्क्यांनी वाढली आहे, म्हणजेच अक्षयने यात मोठी कमाई केली आहे.
दुसरा फ्लॅटचा कार्पेट एरिया फक्त २५२ चौरस फूट आहे. अक्षय कुमारने तो फ्लॅट आता १.३५ कोटी रुपयांना विकला आहे, जो त्याने २०१७ मध्ये फक्त ६७.९० लाख रुपयांना खरेदी केला होता. या छोट्या फ्लॅटच्या किमतीत ९९ टक्के वाढ झाली आहे! या मालमत्तेसाठी ६.७५ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क जमा करण्यात आले होते.