सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 07:41 AM2020-07-20T07:41:41+5:302020-07-20T08:14:50+5:30

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारसी मान्य करत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) नाईट शिफ्ट अलाउंस दिला जाणार आहे.

यासंबंधी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT- Department of Personnel and Training) निर्देश गेल्या १३ जुलैला जारी केले असून 1 जुलैपासूनच याबाबतचे नियम लागू सुद्धा करण्यात आले आहेत.

ज्या प्रकरणांमध्ये नाईट वेटेज (Night Weightage)च्या आधारे कामकाजाची वेळ ठरवली आहे, अशा प्रकरणात नुकसान भरपाई दिली जाणार नाही. नाईट ड्युटी दरम्यान, दर तासासाठी 10 मिनिटे वेटेज दिले जाईल.

सरकारच्या माहितीनुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत केलेल्या कामालाच नाईट शिफ्ट समजली जाणार आहे.

नाईट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पगाराच्या आधारे एक सीलिंग ठरवली आहे. कार्मिक विभागाने म्हटले आहे की, नाईट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पगाराची सीलिंग 43,600 रुपये प्रति महिनाच्या आधारावर ठरवली आहे.

सरकारकडून नाईट शिफ्ट अलाउंस तासांच्या आधारावर दिला जाणार आहे. तो BP+DA/200च्या समकक्ष असणार आहे. बेसिक आणि महागाई भत्ता हा सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसारच गृहित धरला जाणार आहे. सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी हा नियम लागू असेल.

केंद्र सरकार नाईट शिफ्ट अलाउंसची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बेसिक पे आणि नाईट ड्युटीच्या आधारावर करणार आहे.

दरम्यान, नाईट शिफ्टसाठीच्या अलाउंसमध्ये बदल करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होती. आता केंद्र सरकराकडून ती मान्य करण्यात आली आहे. मात्र, काही संघटनांनी या पद्धतीतही त्रृटी असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारने मान्य केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली आहे. पण, यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर मोठा भारही पडणार आहे.