७ लाख पगार, तरीही सोडली नोकरी; सुरू केला कपडे धुण्याचा व्यवसाय, उभी केली १०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 09:42 AM2023-09-28T09:42:59+5:302023-09-28T10:01:48+5:30

आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी हवी.

आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी हवी. जमशेदपूर येथील अरुणाभ सिन्हा या युवकाच्या संघर्ष कहाणीत याचीचच प्रचिती येते. मुंबई आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या या युवकानं आज १०० कोटींचं साम्राज्य उभं केलंय.

देशातील यशस्वी स्टार्टअपमध्ये अरुणाभचं नाव घेतले जाते. अरुणाभने सुरुवात लॉन्ड्री सर्व्हिसपासून केली. भारतात बहुतांश लॉन्ड्री सर्व्हिससाठी धोबी असतात. ते तुमच्या घरातून कपडे घेऊन जातात, त्यानंतर ते धुवून इस्त्री करून घरी आणून देतात. त्यातून जे काही मिळते त्यात ते उदरनिर्वाह करतात.

परंतु अरुणाभनं लॉन्ड्री सर्व्हिसमध्येच कोट्यवधीचा व्यवसाय उभारला. प्रसिद्ध UClean चे मालक आहेत. देशातील १०० हून अधिक शहरात ते सेवा देतात. सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला अरुणाभ सिन्हाचा संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे.

अरुणाभ सिन्हाचे वडील शिक्षक होते. ते ट्यूशन घ्यायचे. आई गृहिणी होती. अरुणाभ शिक्षणात हुशार होता. त्यातूनच त्याने आयआयटी मुंबई येथून सायन्समध्ये मास्टर्स केले. पदवी घेतल्यानंतर त्याने पुण्यातील यूएस बेस्ड कंपनीत एनालिकिटकल असोसिएट म्हणून कामाला सुरुवात केली. परंतु अरुणाभचं नोकरीत मन रमत नव्हते.

२०११ मध्ये अरुणाभने फ्रेंग्लोबल नावाची बिझनेस कंसल्टिंग फर्म उघडली. त्यातून परदेशी कंपन्यांना मदत करण्याचे काम केले. २०१५ मध्ये अरुणाभने एका फ्रेचाइजला त्याचा व्यवसाय विकून टाकला. त्यानंतर Treebo Hotels ने अरुणाभला उत्तर भारतातील डायरेक्टर बनवले.

हॉटेल इंडस्ट्रीत काम करताना अरुणाभच्या लक्षात आले की, जे गेस्ट हॉटेलमध्ये थांबतात त्यांना वापरलेले कपडे, बेडशीटवरील डाग, कपडे धुणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याकडे येत असत. येथूनच अरुणाभने लॉन्ड्री सेवेचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही एक संधी पाहिली आणि नोकरी सोडली असं त्याने एका मुलाखतीत सांगितले.

२०१६ मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये लॉन्ड्री सेवा देणाऱ्या UClean कंपनीची त्याने सुरुवात केली. त्यासाठी अरुणाभने मार्केट रिसर्च केला. बिझनेस सुरु करताना येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांवर काम केले. राजधानी दिल्लीपासून सुरु झालेला हा बिझनेस पुणे-हैदराबादसह देशातील १०० शहरांमध्ये पसरला. आज देशभरात ३५० हून अधिक स्टोअर आहेत.

केवळ भारताच नाही तर बांग्लादेश, नेपाळमध्येही UClean कंपनी पोहचली आहे. या कंपनीचे वैशिष्टे म्हणजे किलोच्या हिशोबाने कपडे धुण्याचे दर आकारले जातात. कंपनीचा माणूस तुमच्या घरी येतो, तुमच्या कपड्याचे वजन करतो आणि प्रति किलो किती चार्ज आकारले जातील हे सांगतो. कंपनी ग्राहकांना २४ तासांत ही सेवा देते.

UClean कंपनीत कर्मचारी कपडे धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करतात. त्याशिवाय एंजाइम बेस्ड डिटर्जेंट वापरले जाते. ज्याने पर्यावरणालाही काही नुकसान होत नाही. देशात प्लास्टिक मुक्त अभियानातंर्गत कपड्यांना इस्त्री करून मेटल बास्केटमध्ये ते लोकांच्या घरापर्यंत पोहचवले जाते.

अरुणाभच्या संघर्षाची सुरुवातच अपयशाने झाली. अरुणाभनं जिथे पहिले स्टोअर उघडले होते. तिथे अचानक आग लागल्याने पहिल्याच महिन्यात त्याला १२ लाख रुपये नुकसान झाले. परंतु त्याने हार मानली नाही. त्यानंतर फ्रेंचायसी मॉडेलवर काम करत अरुणाभने पुढे वाटचाल सुरू केली.