३५ हजार कोटींची संपत्ती, अतिशय साधी जीवनसरणी; भारताच्या श्रीमंत महिलांपैकी एक, कमी लोकांना माहितीये नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:20 AM2024-01-06T08:20:53+5:302024-01-06T08:33:39+5:30

अलीकडेच त्या ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार सर्वात श्रीमंत सेल्फ मेड भारतीय महिला बनल्या आहेत.

गेल्या काही वर्षात भारतात अनेक महिला उद्योजकांनी मोठं नाव कमावलं आहे. मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असली तर यश हे मिळतंच. देशातील लाखो तरुण उद्योजकांना प्रेरणा देणारी अशीच एक महिला म्हणजे झोहो कॉर्पोरेशनच्या सह-संस्थापक राधा वेम्बू. अलीकडेच त्या ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ नुसार सर्वात श्रीमंत सेल्फ मेड भारतीय महिला बनल्या आहेत.

डीएनए रिपोर्टनुसार, राधा वेम्बू यांची संपत्ती ३४,९०० कोटी रुपये आहे. या बाबतीत, त्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ४० व्या स्थानावर आहेत. राधा वेम्बू जानकी हाय-टेक अॅग्रो या कृषी एनजीओ आणि हायलँड व्हॅली नावाच्या रिअल इस्टेट कंपनीच्या संचालक देखील आहेत.

राधा आणि श्रीधर वेम्बू यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर होते. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या, राधा वेम्बू आणि श्रीधर वेम्बू यांनी स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. IIT मद्रासमधून इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर राधा वेंबू १९९७ मध्ये झोहोमध्ये सहभागी झाल्या.

टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनकडे असलेला त्यांचा कल यामुळे त्यांनी हळूहळू मोठी प्रगती केली. राधा वेम्बूंची संपत्ती प्रामुख्याने चेन्नईस्थित मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी झोहो कॉर्पोरेशनमधील त्यांच्या सर्वात मोठ्या स्टेकमध्ये आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेम्बू यांच्याकडे केवळ ५ टक्के हिस्सा आहे, परंतु राधा वेम्बू यांच्याकडे ४७ स्टेक आहेत. श्रीधर वेम्बू स्वत: त्यांचा संघर्ष, यश आणि साधेपणासाठी ओळखले जातात.

राधा वेम्बू यांच्या नेतृत्वाखाली झोहोने त्यांच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये प्रचंड वाढ पाहिली. सध्या, झोहो १८० देशांमध्ये विविध व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान सेवा प्रदान करते.

राधा वेम्बू यांना व्यवसायासोबतच आपल्या सामाजिक जबाबदारीसाठीही ओळखले जाते. तरुणांना शैक्षणिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि शिष्यवृत्तींबाबत मोठं पाऊलही उचलले आहे.