पोस्टात ७९५ रुपयांत २० लाखांचा विमा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 09:16 IST2022-10-23T09:08:05+5:302022-10-23T09:16:40+5:30
post office : टाटा एआयजीला वार्षिक प्रीमिअम ३९९ रुपये आणि बजाज एलायंजला ३९६ रुपये प्रीमिअम भरावा लागतो.

अपघात झाल्यानंतर व्यक्ती आणि कुटुंबावर अचानक संकट कोसळते. अपघात झालेल्या व्यक्तीला शारीरिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही अडचण येऊ नये, यासाठी टपाल कार्यालयाने ७९५ रुपयांमध्ये टाटा एआयजी आणि बजाज एलायंज या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित विमा योजना आणली आहे. हा अपघाती विमा टपाल विभागाकडून उतरविण्यात येतो.
वर्षाला ७९५ रुपयांचा हप्ता
टाटा एआयजीला वार्षिक प्रीमिअम ३९९ रुपये आणि बजाज एलायंजला ३९६ रुपये प्रीमिअम भरावा लागतो.
वैद्यकीय खर्चासाठी कॅशलेसची सेवा
अपघात झाल्यानंतर वैद्यकीय खर्चासाठी टाटा एआयजीकडून ६० हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते. त्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यास दावा करणे आवश्यक आहे. तर, बजाज नेटवर्कच्या रुग्णालयांमध्ये ६० हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्चासाठी कॅशलेसची सुविधा आहे.
अपघातात मृत्यू झाल्यास वीस लाख
1) अपघातात मृत्यू झाल्यास दोन्ही कंपन्यांकडून प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांचा लाभ मृताच्या कुटुंबातील वारसदारास दिला जातो. 2) कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीस प्रत्येकी दहा-दहा लाख रुपये दिले जातात. तर, अर्धांगवायू झाल्यासही तेवढ्याच रकमेचा लाभ मिळतो. १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तीला हा विमा घेता येतो.
या योजनेसाठी कागदपत्रे
1) केवळ आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक. 2) इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत खाते आवश्यक. 3) कोणत्याही टपाल कार्यालयातून योजनेचा लाभ शक्य.
जीवन प्रमाणपत्र शुल्कावर ५० टक्के वार्षिक सवलत
विमा योजनेसोबत इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेत प्रीमिअम खाते उघडता येते. प्रीमिअम खात्यामध्ये मोफत घरपोच बॅंकिंग सेवा, अमर्यादित विनामूल्य रोख ठेव जमा करता आणि काढता येते. वीजबिल भरणा केल्यास त्यावर रोख परतावा, जीवन प्रमाणपत्र शुल्कावर ५० टक्के वार्षिक सवलत असे फायदे देण्यात आले आहेत, असे मुंबई क्षेत्रातील पोस्टमास्टर जनरल स्वाती पाण्डेय यांनी सांगितले.