Hinduja family feud: १०८ वर्षांची परंपरा असलेल्या हिंदुजा ग्रूपमध्ये फूट! ३८ देशांमध्ये बिझनेस; १५०,००० हून अधिक कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:47 AM2022-11-16T10:47:46+5:302022-11-16T10:57:58+5:30

ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या हिंदुजा कुटुंबात फूट पडली आहे. १०८ वर्षांची परंपरा असलेल्या हिंदुजा ग्रूपची एकूण संपत्ती १४ अब्ज डॉलर इतकी आहे. हिंदुजा बंधूंमध्ये बऱ्याच कालावधीपासून वाद सुरू आहेत. हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ ८६ वर्षीय श्रीचंद हिंदुजा यांच्या वकिलांनी नुकतेच लंडनच्या न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाने २०१४ चा करार रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे.

कुटुंबातील हा करार ३० जून २०२२ रोजी झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या महिन्यातच कुटुंबाची विभागणी होऊ शकते. करारानुसार नोव्हेंबरमध्ये कुटुंबांमध्ये विभाजन झाले नाही तर हे प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात जाऊ शकते. या समूहात डझनभर कंपन्या असून त्यापैकी सहा लीस्टेड कंपन्या आहेत. यामध्ये इंडसइंड बँकेचाही समावेश आहे.

हिंदुजा कुटुंबातील भांडणाचे मूळ २ जुलै २०१४ रोजी झालेला करार आहे. त्यावर चारही भावांच्या सह्या होत्या. त्यात म्हटले आहे की कुटुंबातील सर्व काही प्रत्येक व्यक्तीचे आहे आणि काहीही कोणाचे नाही. श्रीचंद हिंदुजा यांनी त्यांचे भाऊ जीपी हिंदुजा, पीपी हिंदुजा आणि एपी हिंदुजा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे २०१४ च्या कराराच्या वैधतेशी संबंधित आहे. नोव्हेंबर २०१९ पासून यावरून कायदेशीर वाद सुरू होता.

श्रीचंद हिंदुजा यांच्या तीन लहान भावांनी असा युक्तिवाद केला की हे पत्र १०० वर्षांहून अधिक जुन्या हिंदुजा समूहासाठी उत्तराधिकार योजना आहे. मात्र याला श्रीचंद हिंदुजा यांच्या मुली शानू आणि वीणू यांनी आव्हान दिले होते. केवळ ब्रिटनमध्येच नाही तर युरोपातील अनेक देशांमध्ये हिंदुजा ब्रदर्समध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. यामुळे कुटुंबाचे नुकसान होत आहे.

हिंदुजा समूहाचा व्यवसाय ट्रक उत्पादनापासून बँकिंग, रसायने, उर्जा, मीडिया आणि आरोग्यसेवेपर्यंत पसरलेला आहे. समूह कंपन्यांमध्ये ऑटो प्रमुख अशोक लेलँड आणि इंडसइंड बँक यांचा समावेश आहे. १४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह हिंदुजा कुटुंब हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. या समूहाच्या कंपन्यांचा व्यवसाय ३८ देशांमध्ये पसरलेला असून १५०,००० हून अधिक कर्मचारी त्यामध्ये काम करतात.

हिंदुजा ग्रुपची स्थापना ब्रिटिश भारतातील सिंध प्रांतातील श्रीचंद परमानंद यांनी १९१४ मध्ये केली होती. हिंदुजा समूह ही एकेकाळी कमोडिटी-व्यापाराची फर्म होती. परंतु श्रीचंद आणि त्यांच्या भावांनी त्यांचा व्यवसाय इतर क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढवला.

हिंदुजा कुटुंबातील मतभेदाची पहिली बातमी तेव्हा आली जेव्हा श्रीचंदच्या मुलींनी स्वित्झर्लंडमधील एसपी हिंदुजा बॅंक प्रिव्ह एसएच्या नियंत्रणावर कोर्टात केस दाखल केली. श्रीचंद यांची मुलगी शानू या बँकेच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा मुलगा करम हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांनाही या बँकेवर त्यांचे नियंत्रण हवे होते, त्यानंतर वाद सुरू झाला. या वादामुळे १०० वर्षांहून अधिक जुने कॉर्पोरेट साम्राज्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर आले.

सुत्रांच्या माहितीनुसार हिंदुजा ग्रुपची स्वित्झर्लंडमधील बँक एसपी हिंदुजा ग्रुपकडेच राहू शकते. मात्र, हिंदुजा कुटुंबाने ही बँक एसपी गटाला देण्याचे मान्य केले आहे की नाही, याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही. SP हिंदुजा ग्रुपने २०१३ मध्ये Banca Commerciale Lugano विकत घेतले आणि हिंदुजा बँकेत (स्वित्झर्लंड) विलीन केले. नंतर त्याचे नाव बदलण्यात आले. श्रीचंद हिंदुजा त्याचे संस्थापक अध्यक्ष झाले. श्रीचंद यांची तब्येत ठीक नसून त्याचा फायदा घेऊन त्याच्या मुली त्याच्या इच्छेविरुद्ध काम करत असल्याचा आरोप त्याच्या भावांनी केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, श्रीचंद हिंदुजा डिमेंशियाने त्रस्त आहेत.

स्विस बँक हिंदुजा ग्रुपच्या बाकीच्या कंपन्यांपेक्षा खूपच लहान आहे पण बँकेकडे लक्षणीय क्रॉस होल्डिंग आहे. अशोक लेलँडमध्ये त्यांची ४.९८ टक्के भागीदारी आहे. सध्याच्या मार्केट कॅपनुसार त्याची किंमत २१९५ कोटी रुपये आहे. याशिवाय एसपी हिंदुजा, मॉरिशसस्थित इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स (IIH) चे अध्यक्ष एमेरिटस आहेत. इंडसइंड बँकेत त्यांची १२.५८ टक्के हिस्सेदारी आहे. या बँकेचे मार्केट कॅप ८९ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्यानुसार, IIH च्या भागभांडवलाचे मूल्य ११,२०५ कोटी रुपये आहे.