गुंतवणुकीची मेगा संधी! डिसेंबरमध्ये १० कंपन्यांचे IPO येतायत; १० हजार कोटी उभारणार, पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:23 PM2021-12-02T13:23:36+5:302021-12-02T13:28:27+5:30

डिसेंबर महिन्यात अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये येऊन धडकणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. असे असले तरी अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये येऊन धडकत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.

गो फॅशनसारख्या कंपन्यांनी IPO च्या पदार्पणातच गुंतवणूकदारांना ९० टक्के परतावा देऊन मालामाल केले. तर पेटीएमसारख्या IPO मुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली. आता डिसेंबर महिन्यात जवळपास १० कंपन्या आपले IPO सादर करत असून, या माध्यमातून सुमारे १० हजार कोटी रुपये उभारण्याचा कंपन्यांचा मानस असल्याचे सांगितले जात आहे.

नोव्हेंबर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिना देखील IPO साठी खास असणार आहे. Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स आणि तेगा इंडस्ट्रीजचे IPO सबस्क्रिप्शन सुरू असून, या कंपन्यांचे आयपीओ आता गुंतवणूकदारांसाठी खुले झाले आहेत.

डिसेंबर महिन्यात येत असलेल्या IPO मध्ये प्रामुख्याने ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रोव्हायडर रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी आणि आनंद राठी वेल्थ लिमिटेड यांची नावे चर्चेत आहेत. आनंद राठी वेल्थ लिमिटेड हा मुंबईस्थित आर्थिक समूह आनंद राठीचा एक भाग आहे.

RateGain चा ०१ हजार ३३५ कोटी रुपयांचा IPO ७ ते ९ डिसेंबरदरम्यान लोकांसाठी खुला होणार आहे. याशिवाय इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी IPO साठी तयारी केली असून, यामध्ये ग्लोबल हेल्थ लिमिटेड, जी मेदांता ब्रँड अंतर्गत हॉस्पिटल चेन चालवते, फार्मसी रिटेल चेन मेड प्लस हेल्थ सर्व्हिसेस आणि हेल्थियम मेडेट यांचा समावेश आहे.

या कंपन्यांशिवाय मेट्रो ब्रँड, श्रीराम प्रॉपर्टीज, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, श्रीबजरंग पॉवर अँड इस्पात आणि व्हीएलसीसी हेल्थकेअर देखील त्यांचे आयपीओ आणू शकतात. या कंपन्यांची कागदपत्रे सध्या पुनरावलोकनाच्या टप्प्यात आहेत.

या सर्व कंपन्या डिसेंबर महिन्यात IPO द्वारे १० हजार कोटी रुपये उभारू शकतात. आयपीओच्या मदतीने कंपन्या निधी उभारतील आणि यामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होईल. यापैकी काही IPO OFS अंतर्गत जारी केले जातील म्हणजेच ‘ऑफर फॉर सेल’ अंतर्गत उपलब्ध असतील.

OFS च्या मदतीने खासगी इक्विटी कंपन्या किंवा प्रवर्तक त्यांचे होल्डिंग विकून रोख रक्कम जमा करू शकतात. LearnApp.com चे संस्थापक आणि CEO प्रतीक सिन्हा म्हणतात की, IPO येत असल्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये मोठी उडी दिसू शकते.

आयपीओ ही बुल मार्केटमधील कोणत्याही कंपनीसाठी सर्वोत्तम संधी आहे. यामुळेच प्रत्येक कंपनी अशा वेळी IPO आणण्याची वाट पाहत असते, जेव्हा बाजारात शेअरचे भाव जास्त असतात. कंपन्यांना बाजारातील लोकांच्या उत्साहाचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यात त्यांना यशही मिळते.

सध्या IPO मध्ये गुंतवणूकदारांकडून भरपूर अर्ज प्राप्त होत आहेत आणि IPO ची सदस्यता अनेक पटींनी वाढत आहे. यामुळे कंपन्या IPO च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उभारत आहेत. आगामी काळात हा ट्रेंड कायम राहणार असून, या काळात अनेक टेक कंपन्या IPO आणू शकतात, असे सांगितले जात आहे.

या वर्षावर नजर टाकली तर जवळपास ५१ कंपन्यांनी त्यांचे IPO आणले. यातून १ लाख कोटी रुपये उभे राहण्याची शक्यता आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, दुसरीकडे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा InvIT, ज्याला Power Grid InvIT म्हणून ओळखले जाते, त्याच्या IPO मधून 7,735 कोटी रुपये उभे केले आहेत.

त्याचप्रमाणे ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टने सुरुवातीच्या शेअर विक्रीद्वारे ३ हजार ८०० कोटी रुपये उभे केल्याचे सांगितले जात आहे.