साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 08:57 IST2025-10-12T08:45:14+5:302025-10-12T08:57:18+5:30

Weekly Horoscope: १२ ऑक्टोबर २०२५ ते १८ ऑक्टोबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात गुरू आणि रवी यांचा राशीपालट आहे. दि. १७ रोजी रवी तूळ राशीत, तर दि. १८ रोजी गुरू कर्क राशीत प्रवेश करेल. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत आहे. गुरू मिथुन राशीत असून, दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.४१ वाजता तो कर्क राशीत प्रवेश करील. केतु सिंह राशीत आहे. रवी आणि शुक्र कन्या राशीत असून, दि. १७ रोजी दुपारी १.४६ वाजता रवी तूळ राशीत जाईल. तेथे त्याची युती मंगळ व बुधाशी होईल. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहेत. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींमधून राहील. या सप्ताहात दि. १७ रोजी रमा एकादशी, तसेच दिवाळीतील वसुबारस आहे. दि. १८ रोजी प्रदोष आणि दिवाळीतील धनत्रयोदशी आहे. हा आठवडा दिवाळीची सुरुवात करणारा आहे. याचा लाभ काही राशींना उत्तमरित्या होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

कर्क ही गुरुची उच्च रास असल्यामुळे हे गोचर अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच रवी तूळ राशीत प्रवेश करत असल्याने आगामी काळ तूळ संक्रांत म्हणून ओळखला जाईल. वर्षभरातील मोठा आणि आनंद, उत्साहाच्या दिवाळी सणाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? कोणत्या राशींना दिवाळी गोड, लाभदायक आणि मालामाल करणारी ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा सामान्य आहे. वैवाहिक जीवनात थोडा गोंधळ उडाल्याने दोघातील प्रेम काहीसे आटेल. ह्या आठवड्यात बराचसा पैसा खर्च कराल. काही महागडे कपडे, वाहन इत्यादींची खरेदी करण्यात भरपूर पैसा खर्च कराल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करावा, त्यामुळे भविष्याची तरतूद करू शकाल. व्यापारात कामावर लक्ष ठेवावे लागेल. काही स्थगित झालेल्या योजना कार्यान्वित होतील, ज्या चांगला लाभ मिळवून देतील. ह्या आठवड्यात विचारपूर्वक निर्णय घेणे हितावह ठरेल. नोकरीत कामगिरी चांगली झाल्याची पाहून सहकारी खुश होतील. ते प्रत्येक कामात मदत करतील. विद्यार्थ्यांनी इतर प्रवृत्तीत वेळ वाया दवडू नये. तसेच कोणत्याही बाबतीत अति आत्मविश्वास बाळगू नये. मेहनत करावी.

वृषभ: हा आठवडा सामान्यच आहे. प्रेमीजनांच्या जीवनात माधुर्य राहील. विवाहितांना जोडीदाराच्या भावनांचा आदर ठेवावा लागेल. आर्थिक बाबतीत कोणाचे ऐकून दिखाऊपणा करू नका. अन्यथा त्यांच्या नादी लागून महागड्या वस्तूंची खरेदी करू लागाल. तसेच एखादी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा. व्यापारी काही योजना आखून वाटचाल करतील. ज्या योजना पूर्वी स्थगित झाल्या होत्या त्या आता कार्यान्वित होतील. ह्या आठवड्यात जे कामात मदत करू शकतील अशा लोकांशी संपर्क वाढवाल. नोकरीत वरिष्ठ कामात वाढ करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीच्या ठिकाणी अंतर्गत राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना अध्ययनात विघ्न आणतील अशा मित्रांपासून दूर राहावे लागेल. ह्या आठवड्यात आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांनी सामंजस्य दाखवावे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील. बुडालेले पैसे परत मिळतील. ह्या व्यतिरिक्त जर प्राप्तीचे नवीन स्रोत शोधले असतील तर त्यातून पैशांचा ओघ सुरू होईल. असे असले तरी खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. एखाद्यास वचन दिले असल्यास ते ह्या आठवड्यात पूर्ण होईल. व्यापाऱ्यांना कोणतेही व्यावसायिक धाडस विचारपूर्वक करावे लागेल. अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. ह्या आठवड्यात कोणाशीही भागीदारीत व्यवसाय करू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी ट्रेनिंग घ्यावी लागेल. कामात समस्या येऊ नये म्हणून वरिष्ठांशी सलोखा राखावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात जर काही समस्या असलीच तर ते वरिष्ठांशी चर्चा करू शकतात. मौजमजा करण्याच्या मूडमध्ये असलात तर मात्र स्पर्धा परीक्षेच्या तयारीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ह्या आठवड्यात कोणतेही काम विचारपूर्वक केल्यास ते हिताचे होईल.

कर्क: ह्या आठवड्यात सर्व कामे विचारपूर्वक करावी लागतील. ह्या आठवड्यात आर्थिक स्थितीमुळे थोडे टेन्शन असू शकते. घराचे नूतनीकरण करण्यात भरपूर पैसा खर्च कराल. इतर वस्तूंची खरेदी कराल. ह्यामुळे बराचसा पैसा खर्च होईल. व्यापारी व्यवसायात नवीन काही वाढविण्याचा प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी असे काही बोलू नये किंवा कामात चुका करू नयेत की ज्यामुळे वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतील. अन्यथा त्याचा परिणाम पदोन्नतीवर होण्याची संभावना आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. इच्छित अभ्यासक्रमात यश प्राप्तीची संभावना आहे. नोकरीसाठी तयारी करू शकता, जी हितावह असेल. ह्या आठवड्यात बाहेर जाणे टाळावे.

सिंह: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांना निष्कारण एखादा ताण त्रास देईल. ह्या आठवड्यात प्राप्ती चांगली असली तरी बचत करण्याची एखादी योजना आखावी की ज्यामुळे भविष्याची काळजी करावी लागणार नाही. एखाद्यास वचन दिले असल्यास ते ह्या आठवड्यात पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगला फायदा होईल. व्यवहार स्थगित झाला असल्यास तो पूर्णत्वास जाऊन व्यवसायाची वृद्धी होईल, व त्यामुळे खुश व्हाल. इच्छित लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना सभोवताली वावरणाऱ्या विरोधकांवर नजर ठेवावी लागेल. अन्यथा ते कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थी एखाद्या सरकारी स्पर्धेची तयारी करू शकतात. ह्या आठवड्यात ज्ञान इतरांना देण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. जर एखादी समस्या असलीच तर चर्चेद्वारा ती दूर करण्याचा प्रयत्न आपण कराल. उगाच कोणत्याही गोष्टीवरून राग-राग करू नका.

कन्या: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात एखाद्या सरकारी योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. कामांच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यापारात सावध राहून सौदे पूर्ण करावे लागतील. जे हिताचे असतील. कारकिर्दीत मनोवांच्छित परिणाम मिळतील. नोकरीत पदोन्नतीसह स्थान परिवर्तन संभवते. कोणतीही गुप्त माहिती इतरांना देऊ नये. विद्यार्थ्यांची मनोकामना पूर्ण होईल. त्यांनी मनात कोणतेही नकारात्मक विचार आणू नयेत. ह्या आठवड्यात त्यांना एखादी शिष्यवृत्ती मिळू शकते. तेव्हा त्यांनी मन लावून अभ्यास करावा. हिंडण्या-फिरण्यावर नियंत्रण ठेवावे. शिळे व थंड पदार्थ खाणे टाळावे.

तूळ: हा आठवडा थोडा गोंधळ उडवणारा आहे. ह्या आठवड्यात अत्यंत सतर्क राहावे लागेल. एखाद्या प्रॉपर्टीतून चांगला पैसा कमावू शकाल. एखाद्या सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न उत्तमच असेल. आनंदित व्हाल. कोणतेही काम समजून न घेता करू नये. ह्या आठवड्यात कारकिर्दीकडे लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रकारचे जोखीम घेऊ नये. ह्या आठवड्यात एखादी चूक कार्यक्षेत्री अधिकाऱ्यांसमोर येऊ शकते. त्यामुळे बोलणी खावी लागू शकतात. योजनांबाबत थोडे सतर्क राहावे. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यासात कोणतीही कसूर न करता व थोडे एकाग्रचित्त होऊन अभ्यास केल्यास परीक्षेत ते यशस्वी होऊ शकतील. हा आठवडा त्यांना अनुकूल आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.

वृश्चिक: हा आठवडा विचारपूर्वक कामे करण्याचा आहे. ह्या आठवड्यात आर्थिक देवाण-घेवाण विचारपूर्वक करावी लागेल. ह्या आठवड्यात कोणाकडून कर्ज घेऊ नये. घेतल्यास त्याची परतफेड करण्यात समस्या निर्माण होईल. शेअर्स बाजारात दीर्घ कालावधीसाठी जर गुंतवणूक केलीत तर ती हितावह होईल. व्यापाऱ्यांनी कोणतेही काम नजरेसमोर होईल ह्याची दक्षता घ्यावी. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार सध्या त्यांनी करू नये. विचारपूर्वक व्यवसायाची वृद्धी करावी लागेल. नोकरीत काही तणाव असले तरी घाबरू नका. कामांवर लक्ष केंद्रित करा. एखाद्या गोष्टीने विद्यार्थी त्रासून जातील. त्यामुळे त्यांच्या समस्या वाढतील. गोंधळ होत असेल तर अध्यापकांशी बोलून त्यांनी तो दूर करावा. कोणताही विषय त्यांनी बदलू नये.

धनु: हा आठवडा विचारपूर्वक कामे करण्याचा आहे. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. इतरांना मदत करण्यासाठी पैसे खर्च कराल. कोणतेही काम घाईघाईत करू नये. व्यापाऱ्यांनी ह्या आठवड्यात कामाच्या बाबतीत सावध राहावे. तसेच कोणतेही काम विचारपूर्वकच करावे. त्यांनी कोणावरही विसंबून काम केल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. कामात मनमानी करू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कार्यक्षेत्री नव्याने ओळख निर्माण करतील. त्यासाठी त्यांना एखादे बक्षीस मिळण्याची संभावना आहे. समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त होतील. अभ्यासावरील त्यांचे लक्ष अचानकपणे इतरत्र जाऊ लागेल. त्यामुळे ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. एखाद्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत त्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये. ज्ञानवृद्धीची मिळालेली कोणतीही संधी त्यांनी वाया दवडू नये.

मकर: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक गोष्टींचे टेन्शन घ्याल. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. प्रॉपर्टीत पैसा गुंतवणे हितावह होईल. कारकिर्दीत समस्या उद्भवण्याची संभावना असल्याने जपून पाऊल उचलावे. व्यवसायात जर एखादी ऑफर आलीच तर ती विचारपूर्वक स्वीकारावी. कोणाच्याही सांगण्यावरून होकार देऊ नये. नोकरीत पदोन्नती संभवते. कामगिरीच्या जोरावर प्रगती कराल. मन लावून अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त होईल. परंतु, काही कामांमुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागल्याने त्यांचे अभ्यासावरील लक्ष थोडे कमी होईल. हा आठवडा उच्च शिक्षणास अनुकूल आहे. आपण एखाद्या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकता.

कुंभ: हा आठवडा आनंद देणारा आहे. पूर्वी पेक्षा आर्थिक स्थिती ह्या आठवड्यात चांगली राहिली तरी खर्च विचारपूर्वक करावा. एखादे काम पैशाअभावी स्थगित झाले असले तर ते ह्या आठवड्यात पूर्णत्वास नेऊ शकता. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा खर्च कराल. गोंधळापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. एखादा नवीन प्रकल्प मिळाल्याने कारकीर्द उजळून निघेल. व्यवसाय उत्तम चालेल. परंतु एखादा विरोधक त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा सावध राहावे. नोकरीत वरिष्ठ कामात मदत करतील. पदोन्नती करण्याची योजना आखतील. परंतु एखाद्या कमी दर्जाच्या कामात सहभागी होऊन आपल्या मित्रांना बिघडवू नये. कोणाशीही विचारपूर्वक बोलावे. एखाद्या कामामुळे विद्यार्थ्यांना टेन्शन येऊ शकते. अध्ययनात येणाऱ्या समस्या अध्यापकांच्या मदतीने दूर करण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.

मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबतीत एखादे महत्त्वाचे पाऊल उचलावे लागू शकते. एखाद्या नवीन कामासाठी पैसा खर्च करू शकाल, मात्र त्यामुळे एखादी समस्या उद्भवू शकते. वाहनांवर विचारपूर्वक पैसा खर्च करावा. ह्या आठवड्यात फक्त गरजेच्या वस्तूंसाठीच पैसा खर्च करणे हितावह होईल. कारकिर्दीत यशस्वी व्हाल. दिलेल्या सूचनांचे कार्यक्षेत्री स्वागत होईल. कामगिरीने वरिष्ठ व सहकारी ह्यांना प्रसन्न कराल. ह्या आठवड्यात एखाद्या ठिकाणी विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक केल्यास फायदाच होईल. विद्यार्थी अध्ययनात भरपूर मेहनत करतील, परंतु त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या स्पर्धेत त्यांना चुणूक दाखवावी लागेल. त्याचे फळ त्यांना चांगलेच मिळेल.