साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना छान कालावधी, सरकारी लाभ; पैशांचा ओघ राहील, ६ राशींना खडतर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:12 IST2026-02-01T11:57:22+5:302026-02-01T12:12:10+5:30
Weekly Horoscope: ०१ फेब्रुवारी २०२६ ते ०७ फेब्रुवारी २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात बुध आणि शुक्र यांचे राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत आणि केतु सिंह राशीत आहे. रवि, मंगळ, बुध, शुक्र आणि प्लूटो मकर राशीत आहे. दि. ३ रोजी बुध कुंभ राशीत जाईल. दि. ५ रोजी शुक्र कुंभ राशीत जाईल. तेथे त्यांची युती राहुशी होईल. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.

चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ या राशींमधून राहील. रविवारी माघ पौर्णिमा झाल्यानंतर, सोमवार, दि. २ रोजी गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा आहे. दि. ४ रोजी संत नरहरी सोनार पुण्यतिथी आहे. दि. ५ रोजी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटांनी चंद्रोदय आहे.

एकंदरीत आठवड्याचा आढावा घेतल्यास बुध आणि शुक्र यांचे कुंभ राशीत होणारे गोचर, तिथे राहुशी होणारी युती आणि केतुशी जुळून येणारा समसप्तक योग अनेक राशींसाठी विशेष मानले जात आहे. गुरुप्रतिपदा, संकष्ट चतुर्थी याच आठवड्यात आहे. त्यामुळे गुरुकृपा आणि बाप्पाचे शुभाशिर्वाद मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा सामान्य राहील. आरोग्यात काही चढ-उतार पाहायला मिळू शकतात; डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. आर्थिक स्थिती चांगली राहील. दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन संधी मिळतील, ज्या अत्यंत फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्या जातकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांसाठी हा आठवडा उत्तम आहे; वैवाहिक जीवनात जोडीदार एखादी गोष्ट लपवून ठेवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अभ्यासात मन थोडे कमी लागेल.

वृषभ: हा आठवडा अतिशय चांगला असेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी; आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत मेहनत केल्यास यश नक्की मिळेल. व्यावसायिकांना व्यवसायात नवीन संधी मिळतील, व्यापाराचा विस्तार होईल. प्रेम संबंधांत अधिक जवळीक आणि रोमान्स पाहायला मिळेल. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम राहील. मन लावून अभ्यास करावासा वाटेल, परंतु काही अडथळे येऊ शकतात; ते दूर न केल्यास करिअरमध्ये मागे पडू शकता.

मिथुन: हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील. आरोग्याबाबत थोडे सावध राहा; पैशाच्या बाबतीत तुमची स्थिती उत्तम राहील. धनाची कमतरता भासणार नाही. आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यापाऱ्यांना व्यवसायात नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सावध राहावे. प्रेम संबंधांत तुम्ही खूप रोमँटिक राहाल. जोडीदाराच्या प्रेमात मग्न राहाल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सुखाचे क्षण व्यतीत कराल. कुटुंबात शांती टिकून राहील. शिक्षणाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे; मात्र एखाद्या स्पर्धेत भाग घेत असाल, तर खूप मेहनतीची गरज आहे.

कर्क: हा आठवडा चढ-उतारांचा राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे; आर्थिक स्थिती चांगली राहील, एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळू शकते. व्यापाऱ्यांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांचे ऑफिसमध्ये कोणाशी तरी भांडण होऊ शकते. प्रेम संबंधांसाठी हा काळ चढ-उतारांचा असेल, तरीही तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी थोडे मतभेद होऊ शकतात. सासरच्या लोकांशी खटके उडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली आहे, अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. उच्च शिक्षणासाठीही काळ अनुकूल असून मित्रांच्या मदतीने प्रगती होईल.

सिंह: हा आठवडा संमिश्र फळ देणारा ठरेल. आरोग्याचा विचार करता काही चढ-उतार जाणवतील; आर्थिक स्थिती ठीक राहील. व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल, परंतु काही अनावश्यक खर्चही वाढू शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे; भागीदारीत व्यवसाय करू शकता. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. नोकरीत कार्यकुशलतेच्या जोरावर उच्च पद मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. समाधानी राहाल. प्रेम संबंधांसाठी हा काळ उत्तम असून जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थी कोचिंगच्या मदतीने यश मिळवू शकतात, मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कन्या: हा आठवडा सामान्य असेल. आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता; डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायाबाबत समाधानी असाल. व्यापारात प्रगतीची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांची दुसऱ्या ठिकाणी बदली होऊ शकते. प्रेम संबंधांसाठी वेळ उत्तम असून जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवनात परिस्थिती सामान्य राहील, परंतु कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशांची आवक सुरू राहील. आर्थिक बाजू अधिक मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात.

तूळ: हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे; पैशांच्या बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यातील समस्या टाळता येतील. व्यावसायिकांसाठी वेळ उत्तम आहे, तुम्ही व्यापारात एखादी नवीन योजना लागू करू शकता. नोकरी करणाऱ्यांना मात्र त्रासाचा सामना करावा लागू शकतो; कामाच्या ठिकाणी पदावरून किंवा कामावरून भेदभाव होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध दृढ राहतील. वैवाहिक जीवनासाठी काळ अतिशय सुखद आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करूनही काही अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक: हा आठवडा अतिशय छान असेल. आरोग्याबाबत थोडे सावध राहावे लागेल. आर्थिक स्थितीबाबत थोडी चिंता असू शकते; खर्चावर नियंत्रण ठेवा आणि उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांना एखादी सरकारी निविदा मिळू शकते, जी पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रात सावधगिरीने काम करावे. प्रेम संबंधांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे; जोडीदाराला खुश करण्यासाठी एखादी भेटवस्तू देऊ शकता. बोलताना अहंकाराची भाषा टाळा, अन्यथा मनस्ताप होऊ शकतो. नवीन कार्य सुरू करताना काळजी घ्यावी, अन्यथा आर्थिक टंचाई भासू शकते.

धनु: हा आठवडा योग्य राहील. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. खर्चात मोठी वाढ होऊ शकते, परंतु उत्पन्न चांगले असल्याने त्याचा विशेष फरक पडणार नाही. काही नवीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास लाभ मिळू शकतो. प्रेमीयुगुलांसाठी काळ अतिशय चांगला आहे, एकमेकांच्या प्रेमात दंग राहाल. वैवाहिक संबंधांसाठी वेळ अनुकूल आहे; जोडीदार कामाच्याानिमित्त बाहेरगावी जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल; मन अभ्यासावरून उडू शकते, ज्यामुळे स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता आहे.

मकर: हा आठवडा खूपच चांगला राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या; आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारशी संबंधित एखादे नवीन काम सुरू करू शकता, ज्यातून लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम असून, त्यांच्या कामाचे कार्यालयात खूप कौतुक होईल. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे त्यांची प्रगती होईल. प्रेम संबंधांत थोडे सावध राहावे लागेल; जोडीदार नाराज होऊ शकतो, पण त्यांची समजूत काढण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक संबंधांसाठी आठवडा उत्तम आहे. भावंडांमधील प्रेम वाढेल. विद्यार्थी अभ्यासात घरातील मोठ्यांचे सहकार्य घेऊ शकतात.

कुंभ: हा आठवडा ठीक-ठाक राहील. मानसिक तणाव त्रास देऊ शकतो; हा तणाव कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा. आर्थिक क्षेत्रात केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला असून, कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. जोडीदाराची ओळख कुटुंबाशी करून देऊ शकता. जोडीदारासोबत खरेदीला जाण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि आर्थिक बाबतीत कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

मीन: हा आठवडा चांगला राहील. आरोग्याबाबत थोडे सतर्क राहा; आर्थिक दृष्टीने हा काळ अत्यंत लाभदायक आहे. उत्पन्नात वाढ होईल. रिअल इस्टेट आणि बिल्डिंग मटेरियलशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठीही वेळ अनुकूल आहे. प्रेम संबंध अतिशय घट्ट होतील. विवाहित लोक आपल्या संसारात समाधानी राहतील. विद्यार्थ्यांच्या बाबतीत कौटुंबिक समस्यांमुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकते, मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम राहील.

















