Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाभोवती चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; सकारात्मक उर्जेला होईल अडथळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:58 PM2022-11-07T16:58:50+5:302022-11-07T17:01:53+5:30

Vastu Shastra: तुळशीचे रोप पवित्र मानले जाते, परंतु ते लावण्यासाठी काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार त्या रोपाच्या सभोवती अन्य गोष्टी ठेवू नयेत. कोणत्या ते जाणून घेऊ! भारतीय संस्कृतीत तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. दैवी गुणधर्मांसोबतच ही वनस्पती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. त्यात अनेक अलौकिक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. सनातन धर्मात तुळशीला अतिशय महत्त्व असल्याने अंगणात, खिडकीत, दारात तुळशीचे रोप हमखास आढळते. पण ते नुसते लावून चालणार नाही तर त्याच्याशी संबंधित गोष्टींची माहिती असणेही आवश्यक आहे.

तुळशीच्या रोपाजवळ भगवान शिव आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र असू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. शंकराला बेल प्रिय असतो, फक्त वैकुंठ चतुर्दशीला शिवपिंडीवर तुळस वाहिली जाते आणि गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय असतात, त्यालाही भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुळशी वाहिली जाते, एरव्ही नाही! म्हणून तुळशी जवळ या दोन्ही देवतांची प्रतिमा ठेवू नये.

तुळस ही नेमही कुंडीत किंवा तुळशी वृंदावनात लावली जाते. इतर रोपांप्रमाणे तिची जमिनीत लागवड करून चालत नाही. कुंडीत तिची वाढ भरभर होते. कारण तुळशीला खूप पाणी घालूनही चालत नाही. थोड्याशा जागेत योग्य मशागत आणि देखरेख मिळाली की ती चांगली फोफावते. शिवाय तुळस ही इतर रोपांच्या तुलनेत अधिक पवित्र मानली जात असल्याने तिचे स्थानही पवित्र असावे या हेतूने तिची जमिनीत लागवड केली जात नाही!

तुळशीचे रोप मोकळ्या आणि स्वच्छ ठिकाणी लावावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशी भोवती अंधार असू नये. म्हणून सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावण्याचा आपल्याकडे संस्कार आहे. तुळस ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे. तिच्याजवळ लावलेल्या दिव्यामुळे तो प्रकाश परावर्तित होऊन ती ऊर्जा घराला मिळते.

तुळशीला पाणी घालता यावे, तिची देखभाल करता यावी आणि तिचे सान्निध्य लाभावे या हेतूने तुळशीचे रोप उंचावर किंवा लटकवलेले नसावे. तुळशीला माता असे आपण संबोधतो. त्यामुळे तिला मानाची जागा देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठीच तुळस नेहमी अंगणात, गॅलरीत किंवा दाराजवळ असावी. जेणेकरून दारामार्गे येणारे वारे तुळशीच्या सान्निध्यात येऊन वातावरण शुद्धी करतील आणि त्याचे आरोग्यदायी लाभ आपल्याला प्राप्त होतील.