Vastu Shastra: मोगऱ्याचे रोप लावा दारी, समृद्धी येईल घरी; वाचा रोप लावण्याची दिशा आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:01 IST2025-07-11T13:57:48+5:302025-07-11T14:01:54+5:30

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात काही रोपे लावणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे केवळ सकारात्मक ऊर्जाच नाही, तर सुख शांतीही मिळते. वास्तूच्या नियमांचे पालन करून मोगर्‍याचे रोप योग्य दिशेला(Benefits of Mogra Plant at home) लावले तर घरातले वातावरण आल्हाददायक तर राहीलच शिवाय घरात सुख समृद्धी नांदेल.

वसंत ऋतू हा मोगरा वळण्याचा काळ. मात्र त्याची लागवड आतापासून केली तर कुठे ऋतुमानानुसार फुलं येतात. मोगरा केवळ सुगंध देत नाही तर घराचे वातावरणही बदलून टाकतो. ज्यांच्या अंगणात, बाल्कनीत मोगऱ्याचा घमघमाट येतो त्या घरांमध्ये इतर घरांच्या तुलनेत वाद विवाद कमी होतात. वास्तूची भरभराट होते आणि पैशांचा ओघ कायम राहतो.

मोगऱ्याचे रोप लावलेली वास्तू सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते. लक्ष्मी तिथे वास करते. तिचा कृपाहस्त त्या वास्तूवर कायम राहतो. मात्र हे रोप योग्य दिशेला लावले नाही तर त्याचा लाभ होणार नाही. भरपूर प्रमाणात फुलेही येणार नाहीत. यासाठीच मोगऱ्याचे रोप लावण्याआधी वास्तूनियम जाणून घ्या.

पूजेच्या फुलांच्या परडीत मोगऱ्याला मान असतो. पांढऱ्या शुभ्र कळ्या, उमलली फुलं, ताजा टवटवीत गजरा कोणालाही पटकन हुंगून घ्यावासा वाटतो. मात्र देवाला वाहण्याच्या फुलांचा सुवास घेतला जात नाही. ती परडीत ठेवली जातात आणि पूजेत देवाला वाहिली जातात. ही फ़ुलं भगवान शंकर, विष्णू तसेच लक्ष्मी मातेला विशेष प्रिय आहेत.

वास्तुशास्त्रानुसार, मोगऱ्याचे रोप योग्य दिशेने लावणे खूप महत्वाचे आहे. जर सर्व वास्तु नियमांचे पालन करून घरात मोगरा लावला तर घरात सुख आणि समृद्धी येते. वास्तुनियमानुसार, हे रोप ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावे. याशिवाय, तुम्ही पूर्वेलाही मोगरा लावू शकता. रोपाला भरपूर सूर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळेल यादृष्टीने ही दिशा परिणामकारक ठरेल.

हे रोप तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ लावू शकता. मात्र शौचालयाच्या किंवा बाथरूमच्या आजूबाजूला लावू नका. मोगऱ्याचे रोप काही कारणाने कोरडे पडले आणि ते पुन्हा चांगले होण्याचे चिन्ह नसेल तर ते वेळीच घराबाहेर काढणे चांगले, अन्यथा तेच रोप नकारात्मक ऊर्जा आकर्षून घेऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार, मोगऱ्याचे रोप योग्य दिशेने लावल्याने मानसिक ताण कमी होतो आणि घरातील वातावरण शांत राहते. हे शुभ रोप घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढवते. कुटुंबातील सदस्यांमध्ये मानसिक तणाव राहत नाही, सदस्यांमध्ये एकोपा राहतो. वास्तूमध्ये आर्थिक वृद्धी तसेच नात्यांमध्ये घनिष्टता वाढवण्याचे काम हे सुगंधी रोप करते.