Vastu Shastra: धनसंपत्ती वाढवायची असेल तर तिजोरीत ठेवा यापैकी कोणतीही एक वस्तू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:32 IST2022-06-15T14:28:18+5:302022-06-15T14:32:26+5:30
Vastu Tips: आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लक्ष्मी मातेचा कृपाशिर्वाद असावा लागतो. पण अनेक वेळा मेहनत करूनही यश मिळत नाही. याची अनेक वास्तुशास्त्रीय कारणे असू शकतात. याबाबत वास्तुशास्त्राचा अभ्यास सांगतो पैसे ठेवण्यासाठी तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. भले सध्या तुमच्याकडे पैसा, दागिने नसतीलही; पण ती रिकामी ठेवण्याऐवजी दिलेल्यापैकी एक गोष्ट नेहमी त्यात ठेवा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तिजोरीची पैशांनी भरेल! त्यासाठी करा सहज सोपे वास्तू तोडगे!

कमळ
कमळ हे लक्ष्मीचे आसन आहे तसेच ते विष्णूंचेही प्रिय फुल आहे. यासाठी दर शुक्रवारी देवीच्या पूजेत कमळ अर्पण करा आणि देवीचा आशीर्वाद म्हणून तिजोरीत ठेवा. दुसऱ्या दिवशी नमस्कार करून कमळ निर्माल्यात टाका. आर्थिक प्रश्न सुटेपर्यंत दर आठवड्याला हा उपाय करत राहा. तिजोरीत कमळ ठेवल्याने धनसंपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
हळकुंड
असे मानले जाते की हळदीचा तोडगा तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतो. अनेक धार्मिक कार्यातही याचा वापर केला जातो. यासाठी गुरुवार किंवा शुक्रवारी लाल कापडात हळकुंड गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा. या उपायाने देखील लक्ष्मी मातेची कृपा राहून धनवृद्धी होते. .
कवडी
लक्ष्मी मातेला कवड्यांची माळ आवडते. लक्ष्मीचे आपल्या घरात वास्तव्य राहावे म्हणून तिजोरीत सुट्या कवड्या किंवा कवड्यांची माळ ठेवावी.विशेषतः धनत्रयोदशी किंवा लक्ष्मी पूजेत त्या देवीला घातल्या जातात. पण दिवाळी येईपर्यंत थांबून राहण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी देवीची पूजा करून तिजोरीत कवड्या ठेवू शकता.
आरसा
वास्तूमध्ये आरसा खूप शुभ मानला जातो. असे म्हणतात की आरशात जे दिसते ते दुप्पट होते. म्हणून तिजोरीत उत्तर दिशेला छोटा आरसा लावावा. त्यामुळे पैशात वाढ होईल.
लाल वस्त्र
लक्ष्मी मातेला लाल रंगाचे वस्त्र खूप प्रिय असते. म्हणून पौर्णिमा, धनत्रयोदशी किंवा दीपावली अशा कोणत्याही शुभ दिवशी तिजोरीत लाल कपड्यात ११ किंवा २१ रुपये बांधून ठेवा. दर महिन्याच्या पौर्णिमेला ते वस्त्र बदला. नक्कीच फरक पडेल.