रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:58 IST2025-08-06T12:52:32+5:302025-08-06T12:58:02+5:30

Shravan Purnima 2025: यंदा श्रावण पौर्णिमा(Shravan Purnima 2025) अर्थात रक्षाबंधनाचा(Raksha Bandhan 2025) कालावधीत अनेक शुभ योग घेऊन येत आहे. ज्यामुळे काही राशींवर लक्ष्मी कृपा होऊन त्यांना आर्थिक वृद्धी, कौटुंबिक आनंद, करिअरमध्ये विकासाच्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. हा शुभशगुन कोणाकोणाच्या वाट्याला येणार ते पाहू.

शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. याच दिवशी श्रावण पौर्णिमा आहे. श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या काळात बुध उदय होणार आहे. तर मिथुन राशीत विराजमान असलेल्या गुरु आणि शुक्र यांचा गजलक्ष्मी योग जुळून येत आहे. ज्याचा लाभ पुढील राशींना मिळू शकेल.

मेष: अडलेल्या कामांना चालना मिळेल. धनवृद्धी होईल. कमाईचे नवे मार्ग सापडतील. आरोग्याची काळजी घ्या. पथ्य पाणी सांभाळा. कौटुंबिक सदस्यांकडून आनंदाची बातमी समजेल. सध्या गुंतवणूक करू नका. क्षेत्र कोणतेही असो जपून पावले टाका. हा काळ लाभाचा आणि इच्छापूर्तीचा आहे. कसून प्रयत्न करा, यश मिळेल.

वृषभ: नोकरदारांसाठी पगार वाढ तसेच पद वाढीची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी व्यवहार जपून करावेत. मात्र नवीन परिचयातून लाभाच्या संधी आहेत. डोळसपणे परिस्थिती हाताळा. कुटुंबसौख्य लाभेल. लक्ष्मीकृपेने आर्थिक बाबतीत वृद्धी होईल आणि मनात दडवून ठेवलेल्या इच्छा आता हळू हळू पूर्ण होतील.

मिथुन: बिघडलेली नाती पूर्ववत होतील. मतभेद, वादविवाद विसरून नात्यांमध्ये एकोपा निर्माण होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. काही कटू आठवणी सोडून देण्यात शहाणपण ठरेल. आगामी काळ आनंदाचा असणार आहे, खुल्या मनाने स्वागत करा. नोकरी व्यवसायासाठीदेखील हा काळ अनुकूल असेल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अडलेली कामे मार्गी लागतील.

कर्क: नोकरीत पगारवाढ होण्याची शक्यता आहे, एवढेच नाही तर पदोन्नतीही होऊ शकते. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना नाव, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक वृद्धी होईल. आरोग्य सुधारेल. मात्र कोणाशीही तुटक वागून कटुता घेऊ नका. काही काळ संयम ठेवा, गोष्टी मनासारख्या घडू लागतील.

सिंह: आरोग्य सांभाळा. स्वच्छ, सात्त्विक आणि शक्यतो घरचे अन्न खा. पैसे जपून वापरा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. लक्ष्मीकृपेने आगामी काळात धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. कष्ट करण्यात कुचराई करू नका. सकारात्मकतेने पुढे जा, यशस्वी व्हाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मनासारखा जोडीदार मिळेल. कुटुंबसौख्य लाभेल.

कन्या: गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पैसे जमवण्यापेक्षा वाढवण्यावर लक्ष द्या. अतिरिक्त खर्च टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना आगामी काळात सुवर्ण संधी मिळेल. लेखक, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांसाठीही हा काळ परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणेल. जोडीदाराची साथ लाभेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पथ्य पाणी सांभाळा.

तूळ: तुमचे संतुलित वर्तन तुम्हाला उत्कर्षाच्या मार्गावर नेणारे ठरेल. मात्र लोकांची पारख करताना चुकभुल करू नका. अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल. जोडीदाराचा सल्ला घ्या. आवडत्या क्षेत्रात काम करत राहा, प्रसिद्धी योग आहे. घरातील कलह, मनमुटाव दूर होऊन घरातल्या सदस्यांमध्ये एकोप्याचे, आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक: व्यापारात नफा देणारा काळ आहे. काही अडचणी येतील पण त्यावर मात करण्याची शक्तीही मिळेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. नोकरदारांना अनपेक्षित पगारवाढ मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. घरात पाहुण्यांचे आगतस्वागत होईल. उत्साहाचे वातावरण राहील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियमित व्यायाम आणि सकस आहाराची जोड देणे आवश्यक आहे.

धनु: वैवाहिक जीवन आनंददायी होईल. जमिनीचे व्यवहार पार पडतील, आर्थिक लाभ होतील. अनुभवी लोकांच्या मदतीने आर्थिक गुंतवणूक करा. सरकारी कामांमध्ये दिरंगाई करू नका. जोडीदाराचा सल्ला घ्या. वादाचे प्रसंग उद्भवले असता मौन धारण करा, अन्यथा नात्यात फूट पडू शकते. मित्रांचे, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे कामाचा भार हलका होईल.

मकर: लक्ष्मीकृपेने आगामी काळ इच्छापूर्तीचा आहे. वाहनखरेदी तथा नवीन जागेची खरेदी करता येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. पोटाचे विकार होऊ शकतात. पथ्य पाणी सांभाळा. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. अपेक्षांचे ओझे कमी केले तर हा काळ कुटुंबसौख्य देणारा ठरेल.

कुंभ: नोकरदार तसेच व्यावसायिकांसाठी हा काळ बुद्धीचातुर्य वापरण्याचा आहे. तरच आर्थिक लाभ होईल आणि सर्वांगीण विकास होईल. तीर्थक्षेत्री जाण्याची योजना आखली जाईल. घरात एखादे मंगलकार्य घडेल. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उचित नाही, त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. जोडीदाराशी प्रेमळ संबंध प्रस्थापित होतील.

मीन: मनाला शांतता, समाधान लाभेल. केलेल्या कामाची पावती मिळेल. नोकरी व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल. बोलताना सांभाळून बोला. गैरसमज टाळा. आवडत्या क्षेत्रात नवीन उंची गाठता येईल. अडलेले व्यवहार मार्गी लागतील. वाहन खरेदी तथा नवीन वस्तूंची खरेदी लाभदायक ठरेल. कुटुंबसौख्य लाभेल. जोडीदाराशी मतभेद झाले तरी वाद टाळा, एकमेकांना समजून घेत सबुरीने वागा.