Shani Jayanti 2025: शनी जयंतीला 'हे' उपाय ठेवा गाठीशी, शनी देव उभे राहतील पाठीशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:06 IST2025-05-26T12:01:14+5:302025-05-26T12:06:52+5:30
Shani Jayanti 2025: शनी देवांना समजून घेण्यात आपण चूक करतो. ते आपला शत्रू नसून मित्र आहेत, आपल्या पाठीशी उभे राहणारे आहेत. आपण प्रामाणिक, नम्र आणि कृतज्ञ असू तर ते सदैव मदतीला येतील. त्यासाठी शुद्ध आचरण आणि शनी जयंतीला करा पुढे दिलेली उपासना.

आपल्या आयुष्यात अडीअडचणी पाठ सोडत नाहीत तेव्हा आपण म्हणतो, काय साडेसाती मागे लागली आहे माहीत नाही! हा साडेसातीचा काळ खडतर असतो, त्या काळात शनी देव आपली परीक्षा घेत असतात. आपल्याला घडवत असतात. मात्र साडेसाती नसतानाही अनेकदा असा कठीण काळ आपली परीक्षा घेत असतो. त्यात सर्वतोपरी निभाव लागावा म्हणून आपण प्रयत्न करत असतोच, त्याला जोड द्या शनी देवाच्या उपासनेची!
आज २६ मे रोजी शनी जयंती (Shani Jayanti 2025)आहे. या दिवशी शनी देवाची यथोचित उपासना करून तुम्ही तुमच्या अडचणीतून मार्ग काढू शकता. त्यासाठी फार साधे सोपे उपाय ज्योतिष शास्त्राने दिले आहेत, ते जाणून घ्या आणि अमलात आणा. यथावकाश तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की सापडेल.
शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे परिधान करा. सूर्याला अर्घ्य द्या. शनी देव हे सूर्यपुत्र आहेत. सूर्याची उपासना ही शक्ती, तेज, बळ देणारी आहे आणि शनिकृपाही प्राप्त करून देण्यास हातभार लावणारी आहे.
त्यानंतर शनी मंदिरात जा. तिथे थेट मूर्तीसमोर न बसता थोडे कोपऱ्यात बसा. राईच्या तेलाचा दिवा लावा आणि 'नीलांजन समभासं रवी पुत्रम यमाग्रजं, छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरं' या मंत्राचा १०८ वेळा जप करा. शनी मंदिरात जाणे शक्य नसेल तर ही उपासना घरीच करा.
मंत्र म्हणून झाल्यावर शनी देवाची पुढे दिलेली दहा नावे भक्तिभावे उच्चारा - शनैश्चरा, शांता, सार्वभीष्ट प्रदायीन, शरण्या, वरेण्या, सर्वेशा, सौम्य, सर्वज्ञ, सुरलोकाविहारीण, सुखसनोपविष्ट नमो नम:
उडीद लोखंड, मोहरीचे तेल, काळे कपडे, काळ्या चपला, ताजे अन्न यापैकी ज्या गोष्टी दान करणे तुम्हाला शक्य असेल त्या गरजू व्यक्तीला अवश्य दान करा. शनी देवांना दानशूर व्यक्ती आवडतात. जे दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात, शनिदेव त्यांच्या मदतीला जातात.
या उपायांनी शनी पीडेतुन तुमची सुटका होईल, शनी दशा, साडेसातीचा काळ सुसह्य होईल आणि तुमच्या अडचणीतून मार्ग सापडून जीवनाला योग्य दिशा मिळेल.फक्त यासाठी आपला भाव शुद्ध हवा, बाकी गोष्टी शनी महाराज सांभाळून घेतील.