शनी-राहुची युती: ‘या’ ५ राशींवर आगामी ७ महिने कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:57 AM2023-03-21T09:57:13+5:302023-03-21T10:10:12+5:30

शनीचा राहुच्या नक्षत्रात होत असलेला प्रवेश काही राशींना संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह नियमित कालावधीत राशी व नक्षत्र बदलत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या या गोचराचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर मानवी जीवनासह देश-दुनियेवर पाहायला मिळतो. ग्रह राशींसह नक्षत्र बदलही करत असतात. आपल्याकडे नक्षत्र आणि त्यातील ग्रहांच्या स्थितीला अतिशय महत्त्व आहे.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी शततारका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे. या नक्षत्रात शनी १७ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असणार आहे. शनीचे राहुचे स्वामित्व असलेल्या शततारका नक्षत्रातील गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे. शनी आताच्या घडीला स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे.

शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणात पुढील ७ महिन्यांपर्यंत शनी विराजमान असणार आहे. शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा स्वामी गुरु आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचा स्वामी शनी आहे. शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणात जन्मलेले लोक जाणकार आणि कुशल वक्ते होऊ शकतात. तर ज्यांचा जन्म शततारका नक्षत्राच्या दुसर्‍या चरणात होतो, ते कष्टाळू आणि श्रीमंत होऊ शकतात.

शततारका नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात जन्मलेली व्यक्ती समृद्ध आणि समाजात सन्माननीय बनू शकते. शनीचा शततारका नक्षत्रातील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना काहीसा समस्याकारक, अडचणीचा जाऊ शकतो. शनी आताच्या घडीला शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणात असून, हा आगामी काळ कोणत्या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनेक बाबतीत त्रासाला सामोरे जावे लागू शकते. प्रकृतीत चढ-उतार दिसून येऊ शकतील. अशी अनेक कामे अचानक समोर येऊ शकतात ज्यामुळे त्यांचे बजेट बिघडू शकेल. एकामागून एक खर्च निघत राहू शकतील. काही अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो. गुप्त शत्रू, हितशत्रू आणि विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. अन्यथा समस्या आणखी वाढू शकते.

कन्या राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक अडचणी वाढू शकतील. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. व्यवसायात जास्त मेहनत होतील पण अपेक्षित नफा न मिळाल्याने निराशा होऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील. विचार सकारात्मक ठेवा. जर तुम्ही घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला यश मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत गंभीर असणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. जमीन, मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे ठरू शकेल. अनावश्यक खर्चही होऊ शकतो. नात्यांमध्ये सुसंवाद राखण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोणाशीही वादात पडू नका. वाहनावर खर्च होईल. आईच्या तब्येतीची चिंता राहील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुंभ राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. आगामी काळ अस्थिर असू शकेल. अशा परिस्थितीत असाल की निर्णय घेणे कठीण होऊ शकेल.खर्च खूप वाढतील. वैद्यकीय खर्चही या दिवसात वाढू शकेल. जोडीदारासोबत वादविवाद घरगुती जीवनावरही परिणाम करू शकतील. कामात सातत्याने व्यत्यय येऊ शकतो.

मीन राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. मीन राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. आर्थिक बाबतीत हा काळ खूप खर्चिक ठरू शकतो. अनेक अनावश्यक खर्चही होऊ शकतील. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. मौल्यवान वस्तुंची, कागदपत्रे यांची काळजी घ्यावी. धोका टाळावा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.