Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:22 AM2021-08-01T07:22:14+5:302021-08-01T07:34:42+5:30

Sawan 2021: श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या कालावधीत प्रामुख्याने साजरी केली जाणारी व्रते, त्यांचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया...

पृथ्वीने नवीन गालीचा ओढळ्याचा काळ म्हणजे श्रावण. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात श्रावण सुरु होत आहे. नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते.

नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. पाण्याची अल्लड धाव मनमोहून टाकणारी असते. प्राणी, पक्षी अवनीच्या या नवरुपामुळे आनंदी झालेले असतात. पावसाच्या शिडकाव्यामुळे हिरवाईची चादर पसरलेली असते. यांसारखी अनेक वैशिष्ट्ये श्रावणाची सांगता येतील.

श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकांतील नाते संबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी एक भावनिक; पण विशिष्ट नियमात जगणारी अमृत महिरप आहे ती. आषाढ अमावास्येनंतर श्रावणास सुरुवात होते. (Shravan 2021)

श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. (Sawan 2021)

महाराष्ट्र सोमवार, ०९ ऑगस्ट २०२१ ते सोमवार, ०६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत श्रावण मास आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या कालावधीत प्रामुख्याने साजरी केली जाणारी व्रते, त्यांचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया... (vrats and festivals in shravan month 2021)

श्रावणी सोमवार - श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदाच्या वर्षी ९ ऑगस्ट, १६ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. (Sawan Somvar 2021 dates)

श्रावणी मंगळवार/मंगळागौर - श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आचरले जाते. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करावयाचे असते. अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते व त्यानंतर रात्री जागरण केले जाते. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. तसेच सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.

श्रावणी बुधवार - श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते. हे व्रत सात वर्षे केले जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे, अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते.

श्रावणी शुक्रवार/जिवतीची पूजा - श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीत या लहान मुलांचे रक्षण करणारी, त्यांना उदंड आयुष्य चिंतणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी व्रतेही आहेत. जीवंतिका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्याचे पावित्र्य सांगणारे व्रत. संतती रक्षणार्थ मानली जाते.

श्रावणी शनिवार/अश्वस्थ-मारुती, नृसिंह पूजन - श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढून त्याचे पूजन केले जाते.

श्रावणी रविवार/आदित्य राणूबाई व्रत - श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल.

श्रावण महिन्यातील या साप्ताहिक व्रतांशिवाय श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी शुक्रवार, १३ ऑगस्ट २०२१ रोजी नागपंचमी आहे. तसेच श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी बहीण-भावांचा जिव्हाळ्याचा रक्षाबंधन साजरा केला जातो. यंदा रविवार, २२ ऑगस्ट २०२१ रोजी नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन आहे.

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. याला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते. या दिवशी दहीहंडी फोडून काला करण्याची परंपरा आहे.

तसेच श्रावण अमावास्येला पोळा किंवा बैलपोळा साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ६ ऑगस्ट २०२१ रोजी श्रावण अमावास्या आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याशिवाय श्रावण शुद्ध एकादशी पुत्रदा एकादशी, तर श्रावण वद्य एकादशी अजा एकादशी म्हणून साजरी केली जाते.