शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:36 IST2025-04-26T12:33:55+5:302025-04-26T12:36:50+5:30
Shani Gochar 2025: २८ एप्रिल रोजी शनि (Shani Transit 2025) उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनि स्वतः उत्तरभाद्रपद नक्षत्राचा स्वामी मानला जातो. स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करताना, शनि पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय होईल. ज्योतिषशास्त्रात शनीला दंडाधिकारी आणि न्यायाधीश अशी पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे ५ राशींना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.

मीन राशीत प्रवेश केल्यानंतर, शनि आता नक्षत्र बदलत आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७:५२ मिनिटांनी शनि उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल आणि २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या नक्षत्रात राहील. उत्तरभाद्रपद नक्षत्राचा स्वामी शनि आहे. या नक्षत्रात शनीचे भ्रमण कर्क आणि धनु राशीसह ५ राशींच्या जीवनात वादळ आणू शकते. या काळात कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि अशा वेळी कोणता सावध पवित्रा घ्यायला हवा ते जाणून घ्या!
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी, शनीचा नक्षत्रातील बदल जीवनात अशुभ परिणाम वाढवणारा मानला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमच्या संबंधांमध्ये संघर्ष वाढू शकतो. मात्र व्यावहारिक जीवनात संतुलन साधता येईल. आप्त नातलगांचा आधार वाटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायला हवे. विशेषतः जुलै ते नोव्हेंबर या काळात जेव्हा शनि वक्री असतो. त्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल. व्यवसायातही कठोर परिश्रम घ्यावे लागतील, तसे केले तरच आर्थिक अडचणी दूर होतील. एक उपाय म्हणून देवीच्या बीज मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी, शनीचे नक्षत्रातील बदल जीवनात समस्या वाढवतील. कर्क राशीसाठी हे संक्रमण आव्हानात्मक काळ घेऊन येईल. तुमच्या चालू कामात अचानक अडथळे येऊ शकतात. व्यवसायिक सहली फायदेशीर ठरतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचे संबंध सुधारू लागतील. गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते अधिक परिपक्व आणि गोड होईल. जुलै ते नोव्हेंबर या काळात आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायला हवी. वडिलांची काळजी घ्या. यावर उपाय म्हणून, शनिवारी काळी उडद डाळ दान करा.
सिंह :
सिंह राशीच्या लोकांसाठी, शनीच्या नक्षत्रातील बदल आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा मानला जातो. एखादा जुना आजार बळावू शकतो. किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुम्ही तुमचे कर्ज फेडू शकाल, ज्यामुळे तुम्हाला थकबाकी भरण्यास मदत होईल. कर्ज फेडण्यासाठीअधिक कष्ट करावे लागतील. मात्र त्यामुळेच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिक जीवनात चढ-उतार येतील. यावर उपाय म्हणून शनिवारी शनी देव तथा मारुती रायाचे दर्शन घ्यावे.
कन्या :
कन्या राशीच्या लोकांसाठी, शनि तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो. जर तुम्ही सध्या नातेसंबंधात असाल तर लग्नाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला खूप विचार करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला आवश्यक असलेल्या बाबींसाठी बँकांकडून कर्ज मिळण्याची शक्यता आहे. यावेळी व्यावसायिक भागीदारांसोबत संबंध वाढवणे महत्वाचे आहे. लांब प्रवास होण्याची शक्यता आहे, जे थकवणारे असले तरी मानसिक शांती देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. वैवाहिक संबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. यावर उपाय म्हणून, दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
मीन :
शनीच्या नक्षत्रातील बदलाचा मीन राशीच्या लोकांवर मोठा परिणाम होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील.जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, तुमच्या नात्यावर त्याचा ताण येऊ शकतो, ज्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. दीर्घकालीन व्यवसाय योजनांवर परिणाम होऊ शकतो. यावेळी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका असा सल्ला दिला जातो. मानसिक ताणतणाव कायम राहील. आरोग्याच्या तक्रारी सुरु होतील. फसवणुकीचे प्रकार घडू शकतात, म्हणून प्रत्येक पावलावर सावध राहा आणि डोळसपणे निर्णय घ्या. यावर उपाय म्हणून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला ११ प्रदक्षिणा घाला.