Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:57 IST2025-11-12T12:44:34+5:302025-11-12T12:57:31+5:30

Samudra Shastra: हसणं नैसर्गिक असेल तर ते सुंदर दिसतं, पण प्रत्येकाचे तसं नसतं. कोणी मनमोकळेपणाने हसतात, तर छोटेसे स्मित करतात. कुत्सितपणे, मग्रुरीने हसणाऱ्यांचे भाव कोणालाही लक्षात येतात. त्यांच्या मनातले कपट कळते. मात्र सुंदर, मनमोहक हास्य असणारे लोक स्वभावानेही चांगले असतात हे कसे ओळखायचे ते पाहू.

हस्तरेखा शास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रानुसार (Palmistry and Samudrik Shastra), व्यक्तीच्या हसण्याच्या पद्धतीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व (Personality) आणि स्वभाव जाणून घेता येतो. हसण्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येकाचे हसणे वेगळे. आज त्याचा अर्थ जाणून घेऊया.

ज्या लोकांचे हसताना दात दिसत नाहीत, त्यांचे हसणे उत्तम मानले जाते. हे लोक खूप साधे आणि सरळ स्वभावाचे असतात. शिवाय ते विश्वासू (Trustworthy) असतात. अशा लोकांचा स्वभाव, वागणे बोलणे सौम्य असते. हे लोक मितभाषी अर्थात कमी बोलणारे आणि कामावर जास्त लक्ष देणारे असतात. त्यामुळे अर्थातच ते जीवनात खूप प्रगती करतात आणि यशस्वी होतात. म्हणून त्यांचे हसणे सौभाग्यशाली मानले जाते.

ज्या लोकांचे हसताना डोळे बंद होतात, ते सहसा आपल्या मनातील गोष्टी कोणासमोरही पटकन उघड करत नाहीत. हे लोक अनेक गोष्टी मनात लपवून ठेवतात आणि समस्या आल्यास त्याचा सामना एकटेच करतात. हे लोक स्वतःच्या पद्धतीने जीवन जगणे पसंत करतात आणि इतरांच्या विचारांची फारशी पर्वा करत नाहीत.

काही लोक नेहमी हसतमुख दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हळूवार हसू (Subtle Smile) कायम असते. हस्तरेखा विज्ञानानुसार, असे लोक आयुष्यभर प्रगती करतात आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हे लोक आपल्या मेहनतीने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि उत्तम जीवन जगतात.

ज्या स्त्रिया सौम्यपणे हसतात, ज्यांचे हसताना किंचित दात दिसतात, अशा स्त्रिया अतिशय सौभाग्यशाली मानले जाते. या महिला आपल्या मनातील आनंद उघडपणे व्यक्त करतात, त्या शांतताप्रिय असतात आणि कोणत्याही परिस्थितीत संयम (Patience) ठेवतात. या गुणांमुळे त्या कठीण परिस्थितीतूनही सहज बाहेर पडतात आणि जीवनात चांगली प्रगती करतात.

ज्या स्त्रिया मोठ्या आवाजात हसतात, त्या मोकळेपणाने जीवन जगणे पसंत करतात. त्या जगाची पर्वा न करता आपल्या पद्धतीने जीवन जगतात. लोकांना त्यांचे हसणे आवडत नसेल तरी, असे लोक जिंदादिलीने (Liveliness) जीवन जगणे पसंत करतात.

हसताना जोरात आवाज काढणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव परिस्थितीनुसार बदलणारा असतो. हे लोक हुशार (Intelligent) आणि चतुर असतात, ज्यामुळे ते त्यांचे काम सहज पूर्ण करतात. मात्र, सामुद्र शास्त्रानुसार, मोठ्या आवाजात हसणाऱ्या लोकांना जीवनात कठिण प्रसंगांचा आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.

तुमचे हसणे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. हस्तरेखा शास्त्रानुसार, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची ठेवण आपल्या जीवनाबद्दल काहीतरी सांगत असते. समुद्र शास्त्राने केलेले हे भाकीत आणि तुमचा अनुभव मिळता-जुळता वाटतो का? कमेंट करून सांगा.