राहू शनि युती २०२५: ३० वर्षांनी तयार होतोय राहू-शनि पिशाच योग; 'या' पाच राशींनी 'मे' पर्यंत जरा जपूनच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:55 IST2025-03-08T17:50:36+5:302025-03-08T17:55:03+5:30
Rahu Shani Yuti 2025: ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीमध्ये शनि आणि राहूची युती होणार आहे, ज्यामुळे पिशाच योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रीय अभ्यासानुसार, शनि-राहूचा (Shani Rahu Yuti 2025) हा धोकादायक संयोग पाच राशीच्या लोकांसाठी चांगला नाही. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना मार्च ते मे या काळात अत्यंत सावधगिरीने पुढे जावे लागेल.

सावधानता म्हणजे नेमकी कोणत्या बाबतीत? हा प्रश्न मनात ओघाने येतो. जसे की मित्र किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. लहान भावंडांसोबत वाद वाढू शकतात, ज्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार वाढेल. आरोग्याच्या समस्या असू शकतात, विशेषतः किरकोळ तरी दीर्घकाळ टिकणारे आजार होऊ शकतात. थोडक्यात अशा बाबी, ज्यामुळे तुमचे वैयक्तिक आयुष्य ढवळून निघू शकते. त्यामुळे कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका आणि सावधपणे, शांत डोक्याने निर्णय घ्या.
मिथुन :
नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ तणावपूर्ण असेल. राग आणि चिडचिड वाढू शकते, ज्यामुळे प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. सांधेदुखी आणि त्वचेच्या ऍलर्जीशी संबंधित समस्या येऊ शकतात. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अधिक दबावाचा सामना करावा लागू शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांना कामात काळजी घ्यावी लागेल.
सिंह :
नोकरी आणि व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते, शत्रू तुमच्या अपयशावर टपून बसतील. आईकडील नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कायदेशीर वादात किंवा मोठ्या भांडणात अडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळा. किरकोळ आरोग्य समस्या (जसे की खोकला, सर्दी, ताप) उद्भवू शकतात. आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल, ज्यामुळे कर्ज घेण्याची गरज भासू शकते.
कन्या :
आरोग्याशी संबंधित समस्या कायम राहतील, त्यामुळे या काळात अतिरिक्त काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात, ज्यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
धनु :
नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये संघर्ष करावा लागू शकतो. सासू-सासऱ्यांशी कटुता येऊ शकते. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील, त्यामुळे मानसिक तणाव वाढेल. गुप्त शत्रू तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध राहा. राजकारणाशी संबंधित लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण राहू गोंधळ करू शकतो, ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
मीन :
हे संक्रमण मीन राशीत होत असल्याने या राशीच्या जातकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. शनीची साडे साती आणि राहूच्या तापदायक वृत्तीमुळे होणाऱ्या कामांमध्ये अडथळा निर्माण होईल. मानहानीचे प्रसंग, नात्यात कटुता आणि आर्थिक अडचणी अशा अनेक गोष्टी एकत्र आल्याने मानसिक दृष्ट्या वैफल्य येऊ शकते. त्यामुळे मन शांत ठेवून तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करणे लाभदायी ठरेल.
उपाय :
या काळात दर शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि शनि मंत्राचा जप करा. राहू ग्रहाला शांत करण्यासाठी नारळ दान करा आणि राहू बीज मंत्राचा जप करा. हनुमान चालिसाचे नियमित पठण करा, यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होईल. शनिवारी काळी उडीद डाळ आणि मोहरीचे तेल दान करा. नोकरी आणि व्यवसायातील अडथळे टाळण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करा.