रस्त्यातले खड्डेसुद्धा तुम्हाला सुरळीतपणे जगण्याचा मार्ग दाखवतात - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:58 PM2021-09-01T14:58:26+5:302021-09-01T15:49:48+5:30

रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते अशी आपल्या इथे वाहन मार्गाची दुर्दशा असते. या निकृष्ट दर्जाच्या कामाचे समर्थन होऊच शकत नाही. कारण ते कधीही कोणाच्याही जीवावर बेतू शकते. परंतु अशा स्थितीतही वाहनचालक आपले कौशल्य पणाला लावून आपल्याला सुखरूपपणे आपल्या ऐच्छिक स्थळापर्यंत पोहोचवतो, तेव्हा त्याचा आदर्श आपल्याला डोळ्यासमोर कायम ठेवायला हवा. कसा ते पहा -

गुळगुळीत हायवे वरून वेगाने गाडी चालवायला मिळणे ही प्रत्येक वाहन चालकासाठी पर्वणी असते, परंतु खडबडीत रस्त्यावरून प्रवास करत आपले ऐच्छिक स्थळ गाठणे हे प्रत्येक चालकासाठी आव्हान असते. आपल्या आयुष्याचा प्रवास सुद्धा कधी गुळगुळीत तर कधी खडबडीत रस्त्यावरून होणार आहे. थांबू नका, कारण प्रवास आपल्या सर्वांना पूर्ण करायचा आहे, सांगत आहेत आध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू.

लॉंग ड्राइव्हला जाताना महामार्ग नेटका असेल, तर प्रवास सुरळीत होतो, अन्यथा अंतरा अंतरावर खड्डे दिसू लागले की वाहनाची गती कमी करावी लागते आणि आपला प्रवास अकारण लांबतो. परंतु अशा वेळी वाहन चालक कंटाळून रस्त्याच्या मध्येच प्रवास सोडून न देता आपल्याला सुखरूप पोहोचवतो. असेच अडथळे आपल्याही आयुष्यात येत राहतात, तेव्हा थांबू नका, कंटाळू नका, चालत राहा, एक ना एक दिवस ध्येयापर्यंत अवश्य पोहोचाल.

खडबडीत रस्ता आणि गुळगुळीत रस्ता आलटून पालटून प्रवासात येणार आहेत. जेव्हा गुळगुळीत रस्ता असतो, तेव्हा प्रवासाचा आनंद लुटा आणि जेव्हा खडबडीत रस्ता येतो तेव्हा सावधान व्हा.

अनुकूल परिस्थिती सतत आपल्याला साथ करेल असे नाही. ती येईपर्यंत किंवा ते मिळेपर्यंत आपल्याला अविरत प्रवास करावा लागणार हे निश्चित आहे. मग रस्त्याला खड्डे पडलेत म्हणत थांबू नका. सावध वळण घ्या, पुढचा मार्ग सुरळीतपणे पार पडेल.

जेव्हा जे क्षण हातात आहेत, ते जगायला शिका. त्यांचा आनंद घ्या. उतू नका, मातू नका. हा रस्ता फार काळ नाही हे ध्यानात ठेवा. कधी कधी खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता असते. स्थल काल परत्वे निर्णय घ्यायला शिका. दुसऱ्याला ओव्हरटेक करण्याच्या नादात तुम्ही स्वतःचा आणि दुसऱ्याचा आनंद हिरावून घेत असता. त्याउलट नियमांचे पालन करा, निश्चिन्त राहा आणि गोगलगायीच्या गतीने का होईना, रोज थोडी थोडी प्रगती अवश्य करा.