पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:10 IST2025-09-13T16:07:25+5:302025-09-13T16:10:44+5:30

Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष(Pitru Paksha 2025) सुरू आहे आणि अशातच एखादे बाळ पितृपक्षात जन्माला आले, तर घरच्यांच्या कपाळावर आठ्या पडतात, थोडं आधी नाहीतर नंतर तरी जन्माला यायला हवे होते, असा नाराजीचा सूर लागतो. याबाबत ज्योतिष शास्त्रात काय भाकीत सांगितले आहे ते जाणून घेऊ.

जन्म आणि मृत्यू आपल्या हाती नाही, ते नियतीच्या हाती असते. आपण मिळालेल्या सुखाचा खुल्या मनाने स्वीकार करून त्यात आनंद शोधला पाहिजे. ज्योतिष शास्त्रानेदेखील त्याची तजवीज करून ठेवली आहे. पितृपक्ष हा जरी पितरांसाठी राखीव ठवलेला असला तरी या कालावधीत आपले काम, व्यवसाय, नोकरी इत्यादी गोष्टी सुरु असतात. मग बाळाने जन्मासाठी हा काळ निवडला तर त्यात त्याचा काय दोष? याबाबत ज्योतिष शास्त्र सांगते...

पितृपक्षाचा काळ पितरांसाठी राखीव ठेवलेला असला, तरी या काळात जन्मलेल्या मुलांचे भाकीत आणि पितृपक्ष यांचा परस्पर संबंध लावणे योग्य ठरत नाही. उलट सश्रद्ध लोक बाळाच्या रूपाने पितर आपल्या घरात पुन्हा जन्माला आले असे म्हणत स्वागत करतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, पितृपक्षात जन्मलेली मुले पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन जन्माला येतात. असे मानले जाते, की ही मुले त्यांच्या कुटुंबात सुख, समाधान, समृद्धी घेऊन येतात आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल असते. धार्मिक मान्यतेनुसार, ही मुले त्यांच्या कुळाचे पूर्वज असतात. असे म्हटले जाते की ही मुले ज्या क्षेत्रात सामील होतात तिथे प्रसिद्धी मिळवतात.

या मुलांना नशीबाची साथ लाभते. आयुष्यात परिस्थिती कशीही असो, नशीब नेहमीच त्यांना साथ देते. ते केवळ नशिबावर अवलंबून राहत नाहीत तर कठोर परिश्रमदेखील करतात. ही मुले मेहनती असतात आणि नेहमीच त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला गौरव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत त्यांचे काम पूर्ण करण्याची अद्भुत क्षमता असते.

पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव खूप आनंदी असतो. ते बुद्धिमान आणि ज्ञानी असतात. विचाराने प्रगल्भ असतात आणि कठीण विषय सहजपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. आपल्या वयापेक्षा मोठ्या लोकांशी त्यांचे चांगले जुळते. स्वभाव मनमिळाऊ असतो. त्यांचे प्रेम, आसक्ती, कुटुंबाबद्दलचे प्रेम खूप जास्त असते.

पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये अनेक गुण असले तरी ज्योतिषशास्त्रानुसार, त्यांच्यात चंद्राचा प्रभाव थोडा कमकुवत असू शकतो. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर ते मानसिक चिंतेचे बळी ठरू शकतात. अशा परिस्थितीत त्यांनी चंद्र ग्रहाशी संबंधित उपाय करावेत. योगसाधना करावी, प्राणायाम आणि ध्यानधारणा करावी. त्यामुळे मन चंचल न राहता उद्विग्न स्थितीतही ते शांत राहील.