Pitru Paksha 2021 : काही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर धर्मशास्त्रात दिलेले पर्याय वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:54 PM2021-09-22T14:54:19+5:302021-09-22T15:04:05+5:30

Pitru Paksha 2021 : श्राद्ध करायचे आहे, परंतु काही ना काही अडचणींमुळे ते करणे शक्य होत नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. श्राद्धाच्या बाबतीत एकाहून एक विकल्प अर्थात पर्याय धर्मशास्त्रात दिले आहेत.

सर्वप्रथम मनात पितरांविषयी श्रद्धा असणे ही मूलभूत गोष्ट अत्यावश्यक आहे. ती असल्यानंतर प्राप्त परिस्थितीस अनुसरून शास्त्रातील पर्यायांचा वापर करावा. ज्यावेळी सपिंड श्राद्ध करणे अशक्य असेल तेव्हा पुढील गोष्टी कराव्यात.

ब्राह्मण भोजन किंवा अतिथी भोजन शक्य नसेल तर मंदिरात जाऊन गुरुजींना दूध, केळी व दक्षिणा द्यावी.

पुरोहित उपलब्ध नसतील तर पितरांचे स्मरण करून दान, दक्षिणा मंदिराच्या दानपेटीत टाकावी किंवा एखाद्या गरजूला द्यावी.

पितरांच्या नावे गायीला नैवेद्य अर्पण करावा किंवा चारा खाऊ घालावा.

श्राद्धाचा स्वयंपाक करणे शक्य नसेल, तर पितरांच्या तिथीच्या दिवशी आणि तिथी माहित नसल्यास सर्वपित्रीच्या दिवशी आपल्या रोजच्या जेवणातले अन्न स्वत: ग्रहण करण्यापूर्वी देवाला आणि कावळ्याला ठेवावे.

पितरांना नैवेद्य अर्पण करताना म्हटला जाणारा मंत्र पाठ नसेल तर दोन्हा हात वर करून पितरांचे स्मरण करून आपली असमर्थता व्यक्त करावी आणि केलेली सेवा गोड मानून घ्या अशी प्रार्थना करावी.

थोडक्यात, ज्यांनी आपली परंपरा, संस्कृती जपली, आपल्याला हे जग दाखवले त्या पूर्वजांचे ऋणनिर्देश करताना अडचणी आल्या म्हणून डगमगून न जाता पर्यायी गोष्टींचा वापर करून श्राद्धविधी जरूर करावेत, हाच मूळ हेतू आहे.