Palmistry: ज्यांच्या तळहातावर 'X' ही खूण असते, त्यांना आधीच कळतात भविष्यातील घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:56 IST2026-01-16T14:45:20+5:302026-01-16T14:56:18+5:30
Palmistry: हस्तसामुद्रिक शास्त्रात तळहातावरील प्रत्येक रेषा आणि चिन्हाला विशेष महत्त्व आहे. अनेकांच्या हातावर 'X' किंवा फुलीचे (Cross) चिन्ह असते. हे चिन्ह कोणत्या ठिकाणी आहे, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. काही ठिकाणी हे चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते, तर काही ठिकाणी ते संकटांचे संकेत देते.

तळहातावरील 'X' किंवा क्रॉस (Cross) या चिन्हाचे हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार (Palmistry) काय महत्त्व आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

१. गुरु पर्वतावर क्रॉस (Cross on Mount of Jupiter)
जर तुमच्या तर्जनीच्या (पहिले बोट) खाली असलेल्या गुरु पर्वतावर क्रॉसचे चिन्ह असेल, तर ते सर्वात शुभ मानले जाते. असे लोक सुशिक्षित, महत्त्वाकांक्षी आणि आनंदी असतात. त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखाचे जाते आणि त्यांना जोडीदाराकडून भरपूर प्रेम व सहकार्य मिळते.

२. शनि पर्वतावर क्रॉस (Cross on Mount of Saturn)
मध्यम बोटाच्या खाली असलेल्या शनि पर्वतावर क्रॉस असणे फारसे चांगले मानले जात नाही. हे चिन्ह कामात येणारे अडथळे किंवा अपघातांचे संकेत देऊ शकते. अशा व्यक्तींना यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.

३. सूर्य पर्वतावर क्रॉस (Cross on Mount of Sun)
अनामिका बोटाच्या खाली असलेल्या सूर्य पर्वतावर क्रॉस असणे सामाजिक प्रतिष्ठेसाठी हानिकारक मानले जाते. अशा व्यक्तीला मान-सन्मान मिळवण्यात अडचणी येतात किंवा काही कारणास्तव बदनामी सहन करावी लागू शकते.

४. बुध पर्वतावर क्रॉस (Cross on Mount of Mercury)
करंगळीच्या खाली असलेल्या बुध पर्वतावर क्रॉस असणे बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. हे लोक चतुर असतात, पण अनेकदा ते आपल्या बुद्धीचा वापर चुकीच्या मार्गासाठी किंवा फसवणुकीसाठी करण्याची शक्यता असते.

५. 'मिस्टिक क्रॉस' (Mystic Cross)
हृदय रेषा आणि मस्तक रेषा यांच्या मध्ये असलेल्या क्रॉसला 'मिस्टिक क्रॉस' म्हणतात. अर्थात तळहाताच्या मध्यभागी हे चिन्ह असते. हे चिन्ह अत्यंत दुर्मिळ आहे. ज्यांच्या हातावर हे चिन्ह असते, त्यांना भविष्यातील घटनांचे आधीच संकेत मिळतात (Intuition). हे लोक अध्यात्म आणि गूढ शास्त्रात खूप प्रगती करतात.

६. शुक्र पर्वतावर क्रॉस (Cross on Mount of Venus)
अंगठ्याच्या खाली असलेल्या शुक्र पर्वतावर क्रॉस असणे प्रेमसंबंधात अडथळे दर्शवते. अशा व्यक्तीला प्रेमप्रकरणात किंवा कौटुंबिक जीवनात संघर्षाचा सामना करावा लागू शकतो.

















