Operation Sindoor: काय होती श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची ताकद? S400 क्षेपणास्त्रालाही दिले तेच नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:04 IST2025-05-09T11:14:29+5:302025-05-09T12:04:27+5:30

Operation Sindoor: सद्यस्थितीत भारत पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धजन्य स्थितीत आहे. पाकिस्तानचे हल्ले थोपवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत S400 या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे. त्यालाच सुदर्शन चक्र अशीही ओळख आहे. हे नाव आपण ऐकले, ते पौराणिक कथांमध्ये! चला तर जाणून घेऊया, या क्षेपणास्त्राला सुदर्शन चक्राची उपाधी देण्यामागचे कारण तरी काय?

हिंदू धर्मातील त्रिदेव महाशक्तीशाली समजले जातात. आज भारतीय नौदल, वायुदल, सेनादल हीच त्रिदेवाची भूमिका घेऊन भारत भूमीचे रक्षण करत आहे. त्या तिघांनी आपले काम वाटून घेतले आहे. ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता, विष्णू पालनकर्ता आणि शंकर संहारक. तिन्ही देवांकडे शक्तिशाली शस्त्र आहेत. ब्रह्मदेवाकडे ब्रह्मास्त्र, महादेवाकडे त्रिशूल आहे आणि विष्णूंच्या बोटात सुदर्शन चक्र आहे. भगवान विष्णूंनी कृष्णावतारात सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला. आज त्या सुदर्शन चक्राची ताकद काय होती ते जाणून घेऊ.

सुदर्शन चक्र अतिशय प्रभावी आणि गतिमान असते. त्या चक्राने आजवर अनेक दैत्यांचा दारुण पराभव केला. हे शस्त्र भगवान विष्णू वगळता अन्य कोणा देवतेच्या हाती नसते. त्याच्या निर्मितीच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी काही बाबी जाणून घेऊया.

देवतांची सृष्टी निर्माते विश्वकर्मा यांनी सुदर्शन चक्राची निर्मिती केली केली अशीही एक कथा आहे. विश्वकर्माची कन्येचा विवाह सूर्याशी झाला. पण सूर्याच्या तेजामुळे ती त्याच्या जवळ जाऊ शकली नाही. याबाबत तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर विश्वकर्माने सूर्याचे तेज कमी केले. आणि उरलेल्या तेजातून विश्वकर्माने तीन गोष्टी बनवल्या. पहिले पुष्पक विमान, दुसरे भगवान शिवाचे त्रिशूल आणि तिसरे सुदर्शन चक्र.

एका पौराणिक कथेत असेही वर्णन आढळते की एकदा असुरांनी स्वर्गावर हल्ला केला आणि देवतांना कैद केले. भगवान विष्णूही त्याचे रक्षण करू शकले नाहीत. त्यांनी भगवान शंकरांना संकट निवारणासाठी प्रार्थना करत १००० कमळ पुष्प समर्पित करणार असा संकल्प सोडला. शंकर प्रसन्न झाले पण एक कमळ गहाळ केले. त्यामुळे विष्णूंचा संकल्प अर्धवट राहिला. त्यावेळी त्यांनी आपला कमलसदृश नेत्र शंकराला अर्पण केला. शंकर खुश झाले आणि त्यांनी विष्णूंना सुदर्शन चक्र भेट दिले त्यामुळे विष्णूंचा विजय झाला.

महाभारतानुसार, भगवान कृष्ण आणि अर्जुन यांनी खांडव वन जाळण्यात अग्नी देवाला मदत केली होती. त्या बदल्यात त्यांनी कृष्णाला सुदर्शन चक्र आणि गदा भेट दिली. तसेच परशुरामाने भगवान श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र दिले होते असेही म्हटले जाते.

सुदर्शन चक्राचे वैशिष्ट्य असे की ते शत्रूचा पराभव करूनच परत येते. त्यापासून पळ काढण्यासाठी संपूर्ण पृथ्वीवर जागा नाही. पौराणिक कथेनुसार ते एका सेकंदात लाखो वेळा फिरते.

हे एक गोलाकार शस्त्र आहे, ज्याचा व्यास सुमारे १२-३० सेमी असते. सुदर्शन चक्राला धारदार किनार असते. असे मानले जाते की हे ब्रह्मास्त्रापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली शस्त्र आहे.

म्हणूनच रशियन कंपनीकडून भारताने घेतलेल्या या क्षेपणास्त्राला सुदर्शन चक्र नाव दिले आहे. ज्याचे उद्दिष्ट शत्रूची विमानं, ड्रोन, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना नष्ट करणे असा आहे. हे क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्यावर आणि ३० किमी पर्यंत उंचीवर मारा करू शकते. त्याचे प्रात्यक्षिक आपण ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) मध्ये आपण बघतच आहोत. याही वेळेस या सुदर्शन चक्राने आपले काम अचूकपणे पार पाडावे हीच प्रार्थना!